हाय व्होल्टेजमुळे इलेक्ट्रॉनिक्स साहित्याचे नुकसान
प्रतिनिधी / बेळगाव
हाय व्होल्टेजमुळे शनिवारी समर्थनगर येथे लाखो रुपयांच्या इलेक्ट्रॉनिक्स साहित्याचे नुकसान झाले होते. हेस्कॉमच्या दुर्लक्षामुळेच हा प्रकार घडल्याचे वृत्त तरुण भारतमध्ये प्रसिद्ध होताच हेस्कॉम प्रशासनाला जाग आली. अखेर रविवारी समर्थनगर पाचवा क्रॉस येथे नवीन ट्रान्स्फॉर्मर बसविण्यात आला. यामुळे समर्थनगर येथील रहिवाशांनी तरुण भारतचे आभार मानले.
शनिवारी समर्थनगर पाचवा क्रॉस येथे अचानक हाय होल्टेजने वीजपुरवठा झाला. यामुळे इलेक्ट्रॉनिक उपकरणांमधून धूर येण्यास सुरुवात झाली. टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन, गिझर, हीटर यासह इतर साहित्याचे मोठे नुकसान झाले.
परिसरातील 80 हून अधिक घरांमधील साहित्याला याचा फटका बसला. याची माहिती हेस्कॉमला दिल्यानंतर ट्रान्स्फॉर्मरमध्ये तात्पुरती दुरुस्ती करण्यात आली. परंतु सायंकाळी पुन्हा असाच प्रकार घडल्यामुळे ट्रान्स्फॉर्मर बदलण्यात येईल, असे आश्वासन हेस्कॉमकडून देण्यात आले होते. त्यानुसार रविवारी सकाळी या ठिकाणी नवा ट्रान्स्फॉर्मर बसविण्यात आला.
हेस्कॉमच्या गलथान कारभाराचा फटका
मागील काही महिन्यांपासून या ठिकाणी होल्टेजची समस्या सुरू आहे. त्यामुळे हेस्कॉम कर्मचाऱयांना यापूर्वी अनेक वेळा माहिती दिली होती. आमदार अनिल बेनके यांच्या उपस्थितीत झालेल्या एका कार्यक्रमातदेखील नागरिकांनी ट्रान्स्फॉर्मरची दुरुस्ती करण्याची मागणी केली होती. त्यावेळी अधिकाऱयांनी लवकर दुरुस्ती करून आणखी एक नवीन ट्रान्स्फॉर्मर बसविण्याचे मान्य केले होते. प्रत्यक्षात मात्र तीन महिने उलटले तरी त्या ट्रान्स्फॉर्मरची दुरुस्ती न केल्यानेच हा प्रकार घडल्याचा आरोप स्थानिकांनी केला.
नुकसानभरपाईची गरज
हाय होल्टेजमुळे या परिसरातील 80 हून अधिक घरांमधील इलेक्ट्रॉनिक साहित्य निकामी झाले. अंदाजे 20 लाखांहून अधिक किमतीच्या वस्तू खराब झाल्या. ट्रान्स्फॉर्मरमधून उच्च विद्युत प्रवाह वाहत असल्यामुळेच हा प्रकार घडला असल्याने हेस्कॉमने या साहित्याचा पंचनामा करून नुकसानभरपाई देण्याची मागणी रहिवासी करीत आहेत. या संदर्भात हेस्कॉमच्या वरिष्ट अधिकाऱयांना निवेदनही देणार असल्याचे स्थानिकांनी सांगितले.