देखभालीअभावी दुरवस्था, खर्च केलेला निधी वाया : दुरुस्ती करून नागरिकांसाठी खुले करण्याची मागणी
प्रतिनिधी /बेळगाव
शहरातील नागरिकांसाठी समुदाय भवन उभारण्यासाठी लाखोचा निधी खर्च करण्यात येत आहे. मात्र देखभालीअभावी समुदाय भवनची दुरवस्था होत असून खर्ची घातलेला निधी वाया जात आहे. विश्वेश्वरय्या नगर सार्वजनिक बांधकाम खात्याच्या क्वॉर्टर्सलगत असलेल्या समुदाय भवनची दुरवस्था झाली असून अवैध कामांसाठी इमारतींचा वापर होत असल्याची टीका नागरिक करीत आहेत.
विविध खात्याचे अधिकारी आणि खासदारांच्या निवासस्थानानजीक असलेल्या खुल्या जागेत समुदाय भवन उभारण्यात आले होते. सदर समुदाय भवन नागरिकांसाठी सोयीचे आहे. सदाशिवनगरसह परिसरात जवळपास समुदाय भवन नसल्याने लहान कार्यक्रम करण्यासाठी हे समुदाय भवन उपयोगी ठरू शकते. पण सध्या या समुदाय भवनाला अवकळा प्राप्त झाली आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याच्या क्वॉर्टर्स परिसरात असणाऱया समुदाय भवनच्या देखभालीकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने ही अवस्था झाली आहे. इमारतीच्या खिडक्मया व दरवाजे पूर्णपणे फोडण्यात आले असून प्रशस्त जागेत असलेल्या समुदाय भवनचा उपयोग अवैध प्रकारासाठी होत आहे.
रात्रीच्यावेळी मद्यपान व धूम्रपान करण्यासाठी समुदाय भवनची इमारत सोयीची बनली आहे. इमारतीच्या आवारात मद्याच्या बाटल्या आणि कचऱयाचे साम्राज्य पसरले आहे. तसेच शेजारी असलेल्या खोल्यांची दुरवस्था झाल्याने इमारतीच्या उभारणीसाठी खर्ची घातलेला निधी पाण्यात गेला आहे. मध्यंतरी सदर समुदाय भवन एका सांस्कृतिक संघटनेला देण्यात आले होते. त्यावेळी इमारतीची दुरूस्ती करून सुसज्ज बनविण्यात आले होते. पण सध्या मनपाने दुर्लक्ष केल्याने इमारतीचा दुरूपयोग होत आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांच्या सोयीसाठी समुदाय भवनची दुरूस्ती करून नागरिकांसाठी उपलब्ध करण्याची मागणी होत आहे.