दांडी किनाऱयावरील घटना : डोके वाळूत आपटल्याने दुखापत
प्रतिनिधी / मालवण:
मालवण दांडी समुद्र किनारी वॉटर स्पोर्ट्सचा आनंद लुटताना बनाना बंपरवरून पाण्यात उडी मारणारा पर्यटक वाळू मातीत डोके आपटल्याने गंभीर जखमी झाला. पर्यटन व्यावसायिक व स्थानिक नागरिकांनी त्यांना तात्काळ खाजगी रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, उपचारानंतर पर्यटकांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले. शुक्रवारी दुपारी ही घटना घडली.
महाराष्ट्राबाहेरील राज्यातून काही युवक पर्यटनासाठी मालवणात आले होते. दांडी समुद्र किनारी पर्यटनाचा आनंद घेताना एका पर्यटकांने समुद्रात डुंबण्याचा आनंद लुटण्यासाठी बनाना बंपरवरून समुद्रात उडी मारली. पर्यटकाचे डोके पाण्याखाली मातीत आपटले, असे सांगण्यात आले. जखमी झालेल्या पर्यटकाला पर्यटन व्यावसायिकांनी तात्काळ खाजगी रुग्णवाहिकेतून खाजगी दवाखान्यात दाखल केले. त्याच्या मानेला दुखावत झाली. मात्र, त्याची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले. पर्यटक जखमी होण्याचे प्रमाण किनारपट्टीवर वाढत असल्याने तातडीने अत्यावश्यक सुविधा किनारपट्टीवरच उपलब्ध करण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. यापूर्वीही चार पर्यटन दांडी किनाऱयावरच बोट पलटी झाल्याने समुद्रात फेकले गेले होते. यातील जखमींवर खाजगी रुग्णालयात उपचार केल्यानंतर गोवा येथे हलविण्यात आले होते. आता पुन्हा एक पर्यटक जखमी झाल्याची घटना घडली आहे.