प्रतिनिधी/ मडगाव
मतदाराने स्वतःचे गुप्त मतदान जगजाहीर केल्याच्या आरोपावरुन एका सरकारी कर्मचाऱयाविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. गोवा पर्यटन विकास महामंडळाचे कर्मचारी तुषार सावंत याच्याविरुद्ध याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
प्राप्त माहितीनुसार वरील सरकारी कर्मचाऱयाने आपली गुप्त पोस्टल मतपत्रिका व्हॉट्सऍप माध्यमातून जगजाहीर केली. यामुळे या मतदाराने आपण कोणाला मत दिले हे जगाला दाखवून दिले आणि इतर मतदारांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी कुडचडेच्या मतदारानी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली. या तक्रारीवर आधारुन केपे विभागाचे उपजिल्हाधिकारी आणि कुडचडेसाठीचे निर्वाचन अधिकारी नीलेश धायगोडकर यांनी केपेच्या पोलीस उपअधीक्षकांकडे याप्रकरणी तक्रार केली आहे.
या तक्रारीवर आधारुन कुडचडे पोलिसांनी केपे येथील गोवा पर्यटक विकास महामंडळाचे कर्मचारी तुषार सावंत याच्याविरुद्ध लोकप्रतिनिधी कायदा -1951 च्या 128 व 129 कलमाखाली गुन्हा नोद केला आहे.