मद्यपींचा बनला अड्डा : मैदानावर कचऱयासह दारूच्या बाटल्यांचा खच
बेळगाव /प्रतिनिधी
शहरातील उद्यान, मैदाने ही सध्या मद्यपींचा अड्डे बनली आहेत. रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत मद्यपींच्या अशा ठिकाणी पाटर्य़ा रंगत असतात. तसेच नशेत दारूच्या बाटल्या फोडून त्या जागेवर धिंगाणा घालण्याचे कामही करतात. त्यामुळे ठिकठिकाणी मैदानात दारूच्या बाटल्यांचा काचा विखुरलेल्या पाहायला मिळत आहेत. अशाचप्रकारे शहरातील सरदार्स ग्राऊंडवर मद्यपींनी आपली मनमानी चालविली आहे. याबाबत प्रशासनाने वेळीच लक्ष देऊन हा प्रकार थांबविण्याची गरज आहे.
पूर्वीचे सरदार्स ग्राऊंड व आताचे यामध्ये खूप मोठा फरक झाला आहे. पूर्वी या मैदानावर स्वच्छता होती. मात्र आता या मैदानात फक्त कचरा, दारूच्या बाटल्यांचा खच पडलेला पाहायला मिळत आहे. तसेच या मैदानावर करणीबाधा करण्याचे प्रकारही वाढले आहेत.
1 कोटी 4 लाख रुपये खर्च करून सरदार्स ग्राऊंडवर क्रिकेट स्टेडियम उभारण्यात आले आहे. याचा फायदा स्थानिक क्रिकेटप्रेमींना व्हावा, तसेच या मैदानावर अनेक क्रिकेटपटू घडावेत हा उद्देश होता. मात्र असे न होता या मैदानावर अनेक गैरप्रकार चालू आहेत. मद्यपान करून फेकलेल्या बाटल्या, सिगारेट, प्लास्टिकच्या पिशव्या, गुटखा, तंबाखू, यासारखी अनेक खाली पाकिटे याठिकाणी टाकण्यात आली आहेत. तसेच पान खाऊन सर्व भिंती गलिच्छ करण्यात आल्या आहेत.
गेल्या जानेवारी महिन्यात उभारण्यात आलेल्या या नव्या इमारतीच्या काचा देखील फोडलेल्या पाहायला मिळत असून अक्षरश: येथील इमारतीची व मैदानाची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे संबंधित खात्याने त्वरित लक्ष देणे काळाची गरज बनली आहे.
सरदार्स ग्राऊंडवर सकाळी ते संध्याकाळपर्यंत अनेक मुले क्रिकेट, फुटबॉल, हॉलीबॉल यासारखे खेळ खेळण्यासाठी येत असतात. सध्या शाळा बंद असल्यामुळे या मैदानावर लहान मुलांची गर्दी मोठय़ा प्रमाणात आहे. त्यामुळे याठिकाणी पडलेल्या काचेच्या बाटल्या मुलांच्या पायांना लागत असून गंभीर दुखापत होण्याचे प्रकारही वाढले आहेत. तसेच या ठिकाणी करणीबाधा करून लिंबू-नारळ यासारखे साहित्य टाकल्यामुळे लहान मुलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
त्यामुळे या ठिकाणी प्रत्येक गेटवर सेक्मयुरिटी गार्डची व्यवस्था करावी. अथवा या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत. जेणेकरून मैदानात होत असलेले गैरप्रकार थांबतील, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.