जुन्या काळात तयार होणाऱया इमारतींची स्थापत्यकला जितकी सुंदर असायची, तितकेच त्यांचे स्थान उत्तम असायचे. मग तो प्राचीन महाल असो किंवा रोमन आणि इजिप्त संस्कृतीशी निगडित इमारती. रशियातही एक असाच सुंदर किल्ला आहे. जो पाहताना सरोवराच्या पाण्यावर तरंगत असल्याचे वाटते.
हा किल्ला रशियात काबार्डिनो बाल्कारिया नावाच्या स्वायत्त भागात निर्माण करण्यात आलेला आहे. चाटेयू इर्कन नावाचा हा किल्ला पाहण्यासाठी विविध ठिकाणांहून पर्यटक येत असतात. सरोवराच्या पाण्यात उभा असलेला हा किल्ला पाहून कुणालाही मध्यकालीन युरोपियन किल्ल्याचा आभास होतो. परंतु तो फार जुना नाही.
किल्ला असलेल्या ठिकाणच्या सरोवरात माशांचे मोठे प्रमाण आहे. या परिसरात जंगल असल्याने येथे विविध प्रकारच्या पक्ष्यांचा किलबिलाट ऐकू येतो. हे सरोवर देखील नैसर्गिक नसून कृत्रिम असून ते खास किल्ल्यासाठीच तयार करण्यात आले होते.
किल्ल्याची छायाचित्रे आणि चित्रफिती सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. हे ठिकाण ऐतिहासिक आणि किल्ला शेकडो वर्षांपूर्वी तयार केल्याचे लोकांना वाटते. परंतु तो एका रशियन उद्योजकाने तयार करविला आहे.
तेम्बुलत एर्केनोव हे रशियाच्या उद्योगजगतातील मोठे नाव आहे. त्यांनी स्वतःच्या प्रतिभेच्या बळावर लवकरच काबार्डिनो बाल्कारियाच्या सरकारमध्ये उपाध्यक्षपद मिळविले. त्यांची स्वतःची वाइनरी असून ती रशियातील सर्वोत्तम वाइनरीजपैकी एक आहे. एर्केनोव यांना ऐतिहासिक किल्ल्यांबद्दल प्रचंड आकर्षण होते. अशा स्थितीत त्यांनी युरोपियन किल्ल्यांनी प्रभावित होत स्वतःचा मध्यकालीन किल्ला तयार करविला आहे.
2010 मध्ये काम पूर्ण झालेला हा किल्ला पर्यटकांच्या आकर्षणाचे मुख्य केंद्र आहे. एर्केनोव यांचे 2017 मध्ये निधन झाले असून आता त्यांची मुले या किल्ल्याची देखभाल करतात. किल्ल्यात एकूण 5 मजले आहेत.