प्रतिनिधी/ बेळगाव
शेतात काम करताना सर्पदंश होवून अत्यवस्थ झालेल्या बेळगुंदी (ता. बेळगाव) येथील एका शेतकऱयाचा शुक्रवारी दुपारी खासगी इस्पितळात मृत्यू झाला. बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे.
मधुकर पांडुरंग चौगुले (वय 52, रा. चव्हाट गल्ली, बेळगुंदी) असे त्याचे नाव आहे. गेल्या मंगळवारी 9 जून रोजी शेतात काम करताना त्याच्या उजव्या हाताला सर्पदंश झाला होता. त्याला खासगी इस्पितळात दाखल करण्यात आले होते. उपचाराचा उपयोग न होता त्याचा मृत्यू झाला.
बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे. पोलीस निरीक्षक सुनीलकुमार नंदेश्वर पुढील तपास करीत आहेत. रताळी लागवड करण्यासाठी जमिनीची मशागत करताना ही घटना घडली आहे. शुक्रवारी रात्री उशीर उत्तरीय तपासणी करुन त्या शेतकऱयाचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.