रशियाकडून मित्रदेशाला मोठी ऑफर : टी-14 अर्माटा रणगाडा जगात सर्वोत्तम
वृत्तसंस्था / मॉस्को
भारताला मागील अनेक दशकांपासून अत्याधुनिक शस्त्रास्त्रs पुरविणाऱया रशियाने आता जगातील सर्वात आधुनिक रणगाडा टी-14 अर्माटाच्या तंत्रज्ञानाची ऑफर भारताला दिली आहे. दोन्ही देशांना नव्या आर्म्ड व्हेइकलचा विकास करता यावा म्हणून रशियाने ही अत्यंत मोठी ऑफर दिली आहे. दोन्ही देशांदरम्यान भारतीय सैन्याच्या गरजा विचारात घेत विशेष उपकरणांच्या निर्मितीवरही चर्चा होतेय.
भारतीय भागीदारांना कामासाठी नव्या क्षेत्रांची ऑफर देण्यात आली आहे. यात अर्माटाच्या प्लॅटफॉर्मवर भारतीय सैन्याच्या गरजेनुरुप आर्म्ड व्हेइकल निर्माण करणे सामील आहे. भारतीय सैन्य नवा मुख्य रणगाडा निर्मितीसंबंधी स्वतःची मोहीम गतिमान करण्याची योजना आखत असताना ही ऑफर महत्त्वाची असल्याचे रशियन अधिकारी वेलेरिया रेशेतनिकोवा यांनी सांगितले. भारतीय सैन्य यापूर्वीच रशियाकडून निर्मित टी-90 आणि टी-72 या रणगाडय़ांचा वापर करत आहे.
रिमोट कंट्रोलद्वारे ऑपरेट
रशियाने स्वतःचा हा नवा रणगाडा सर्वप्रथम 2015 मध्ये जगासमोर आणला होता. तेव्हापासून रशिया टी-14 अर्माटा रणगाडय़ाला अधिक घातक करण्याच्या तयारीत आहे. जगातील सर्वात शक्तिशाली रणगाडा अर्माटा आता चालक दलाच्या सदस्यांशिवाय लक्ष्यावर गोळे डागण्यास सक्षम आहे. टी-14 अर्माटा रणगाडय़ाला अलिकडेच रिमोट कंट्रोलद्वारे संचालित करण्याचे परीक्षण करण्यात आले आहे.
किती घातक? टी-14 अर्माटा रणगाडा रशियाच्या सैन्याचे मुख्य अस्त्र आहे. 80 किलोमीटर प्रतितासाच्या कमाल वेगाने धावणाऱया या रणगाडय़ाचे वजन सुमारे 55 टन आहे. रशियाच्या अर्माटाला नेक्स्ट जनरेशनचा रणगाडा मानले जाते. हा रणगाडा 125 एमएमच्या स्मूथबोर कॅननने युक्त असून ते 10 ते 12 राउंड प्रतिमिनिटाच्या दराने गोळे डागण्यास सक्षम आहे. या रणगाडय़ामधून विमानविरोधी क्षेपणास्त्रही डागता येऊ शकते. याच्या माध्यमातून शत्रूची लो फ्लाइंग ऑब्जेक्ट्स म्हणजेच हेलिकॉप्टर किंवा छोटे ड्रोन पाडविता येऊ शकतात. आतापर्यंत या रणगाडय़ाचे केवळ 20 युनिटच तयार करता आले आहेत.