प्रशासनाकडून सुटकेचा निश्वास : सावंतवाडीत दोघे पॉझिटिव्ह : कुडाळचा कंटेनमेंट झोन 100 मिटरवर
शिवसेना जिल्हाप्रमुख पडतेंसह अनेक पदाधिकाऱयांचा रिपोर्टही निगेटिव्ह
प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:
सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांच्यासह प्रशासनामधील सर्व अधिकाऱयांचा कोरोना तपासणी अहवाल निगेटिव्ह आला आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने सुस्कारा सोडला आहे. शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते यांचाही रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. जिल्हय़ात आणखी सहाजण पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे कोरोना रुग्ण संख्या 296 वर पोहोचली आहे. कोरोनामुळे इन्सुली येथील महिलेचा मृत्यू झाल्याने जिल्हय़ात कोरोनाचा सहावा बळी गेला आहे.
आमदार वैभव नाईक यांना कोरोनाची बाधा झाल्यानंतर जिह्यात खळबळ उडाली होती. शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते आणि जिल्हा प्रशासन हादरले होते. 15 जुलैला जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या प्रशासकीय बैठकांना आमदार नाईक यांनी उपस्थिती लावली होती. त्यामुळे सर्व प्रशासकीय यंत्रणा हादरली होती. त्यामुळे सर्व अधिकाऱयांनी सेल्फ क्वारंटाईन होत कोरोना तपासणीसाठी स्वॅब दिले होते. या सर्वांचा कोरोना तपासणी अहवाल गुरुवारी प्राप्त झाला असून जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी, पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हेमंत वसेकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ धनंजय चाकूरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिपे यांच्यासह सर्वच अधिकाऱयांचे कोरोना तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे मोठा दिलासा मिळाला असून सर्व अधिकारी सेवेत रुजू होत प्रशासकीय कामकाज सुरळीत सुरू झाले आहे.
शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते यांच्यासह शिवसेनेच्या बऱयाच पदाधिकाऱयांचाही रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. त्यामुळे शिवसेना कार्यकर्त्यांना दिलासा मिळाला आहे. मात्र अजूनही काही शिवसेना पदाधिकाऱयांचे कोरोना तपासणी अहवाल प्रलंबित आहेत.
जिल्हय़ात आणखी सहा पॉझिटिव्ह, एकाचा मृत्यू
जिल्हय़ात आणखी सहाजणांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे कोरोना बाधित रुग्णांची संख्या 296 झाली आहे. नव्याने आढळलेल्या सहा रुग्णांमध्ये सावंतवाडी शहरातील दोन, चराठे येथील एक, इन्सुली येथील एक, मालवण तालुक्यातील कुणकवळे येथील एक आणि देवगड येथील एका रुग्णाचा समावेश आहे. इन्सुलीमध्ये कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या महिलेचा गोव्यात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्हय़ात कोरोनाचा सहावा बळी गेला आहे. तसेच जिल्हय़ात आणखी तीन रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे जिल्हय़ातील एकूण 296 पैकी 246 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. सहाजणांचा मृत्यू आणि एकजण उपचारासाठी मुंबईला गेला आहे. त्यामुळे सद्यस्थितीत कोरोना सक्रिय 43 रुग्ण आहेत.
सावंतवाडी चितारआळी, चराठे येथे कंटेनमेंट झोन
सावंतवाडी चितारआळी येथील 100 मीटर परिघाचा परिसर कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे. त्यामध्ये श्रीमंत बापूसाहेब महाराज पुतळय़ासमोरील चितारआळीकडे जाणारा रस्ता, श्री साई हवालदार यांच्या घरालगतचा रस्ता, वाळके मास्तर व्यायामशाळेसमोरील रस्ता, बसस्टॅण्डच्या मागील बाजूने चितारआळीत जाणारा रस्ता, गोमंतक हॉटेलसमोरील रस्ता, बंगलेकर यांच्या दुकानासमोरील रस्ता, गांधी चौक ते चितारआळी चढावाचा रस्ता या परिसराचा समावेश आहे. तसेच मौजे चराठा येथील टेंबवाडी परिसरही कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे. या झोनमध्ये 5 ऑगस्ट रोजी रात्री 12 वाजेपर्यंत सर्व आस्थापना, दुकाने, वस्तूविक्री बंद राहणार आहे.
कुडाळ भैरववाडी येथे 100 मीटर परिसर कंटेनमेंट
कुडाळ तालुक्यातील कुडाळ येथील भैरववाडी-कुडाळ हे केंद्रबिंदू मानून भैरववाडी-कुडाळच्या 800 मीटर परिघ क्षेत्रात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सदरचा परिसर कंटेनमेंट झोन म्हणून बुधवारी जाहीर करण्यात आला होता. तथापि कुडाळचे तहसीलदार, गटविकास अधिकारी आणि आरोग्य अधिकारी यांच्या अभिप्रायानुसार प्रांताधिकारी यांनी स्वतः पाहणी करून या कंटेनमेंट झोनमध्ये बदल करण्यात येत असल्याचे आदेश नव्याने दिले आहेत. या आदेशानुसार भैरव मंदीर येथील 100 मीटरचा परिसर कंटेनमेंट म्हणून जाहीर करण्यात आला आहे. या कंटेनमेंट झोनमध्ये 4 ऑगस्ट रोजी रात्री 12 वाजेपर्यंत सर्व आस्थापना, दुकाने, वस्तू विक्री बंद राहणार आहे.
कलमठ, हळवल येथे कंटेनमेंट झोन
कणकवली तालुक्यातील कलमठ येथील लोटस लॉजमधील तळमजल्यावरील सर्व व्यावसायिक गाळे वगळून इतर परिसर कंटेनमेंट म्हणून जाहीर करण्यात आला आहे. तसेच हळवल येथील परबवाडी येथे 50 मीटरचा परिसर कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे. दोन्ही झोनमध्ये 4 ऑगस्ट रोजी रात्री 12 वाजेपर्यंत सर्व आस्थापना, दुकाने, वस्तू विक्री बंद राहणार आहे.
इन्सुली येथे कंटेनमेंट झोन
सावंतवाडी तालुक्यातील इन्सुली येथील सावंत टेंब हद्दीचा परिसर कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे. या झोनमध्येही 4 ऑगस्ट रोजी रात्री 12 वाजेपर्यंत सर्व आस्थापना, दुकाने, वस्तू विक्री बंद राहणार आहे.
तपासण्यात आलेले एकूण नमुने 4,977
अहवाल प्राप्त झालेले नमुने 4,904
आतापर्यंत पॉझिटिव्ह आलेले नमुने 295
निगेटिव्ह आलेले नमुने 4,609
अहवाल प्राप्त न झालेले नमुने 73
सद्यस्थितीत जिल्हय़ातील सक्रिय रुग्ण 43
उपचारासाठी जिल्हय़ाबाहेर गेलेले रुग्ण 1 (मुंबई)
मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 6
डिस्चार्ज देण्यात आलेले रुग्ण 246
विलगीकरण कक्षात दाखल रुग्ण 73
गुरुवारी तपासणी करण्यात आलेल्या व्यक्ती 4,731
संस्थात्मक अलगीकरणातील एकूण व्यक्ती 15,934 2 मेपासून आतापर्यंत जिल्हय़ात दाखल व्यक्ती 1,46,175