प्रतिनिधी / बेंगळूर
कर्नाटक आणि केरळ किनारपट्टीवर मान्सूनच्या प्रवेशासाठी अनुकूल हवामान निर्माण झाले आहे. परिणामी पुढील दोन दिवस कर्नाटक किनारपट्टी भागात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने राज्यातील सर्व जिल्हय़ांत यलो अलर्टची घोषणा केली आहे.
राज्यातील बेळगाव, धारवाड, बागलकोट, विजापूर, बिदर, यादगीर आणि गुलबर्गा जिल्हय़ामध्ये 5 जूनपर्यंत जोरदार पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. मलनाड भागातील शिमोगा, चिक्कमंगळूर, हासन, कोडगू आणि चित्रदुर्ग जिल्हय़ामध्ये देखील गुरुवारपासून दोन दिवस पाऊस होणार आहे. त्यामुळे सर्व जिल्हय़ांध्ये पुढील दोन दिवस यलो अलर्ट घोषित करण्यात आला आहे.
राज्याच्या किनारपट्टीवरील तिन्ही जिल्हय़ात बुधवारी पाऊस झाला आहे. याशिवाय इतर जिल्हय़ांध्येही तुरळक पाऊस झाला आहे. पणंबूर आणि बागलकोट जिल्हय़ात प्रत्येकी 4 मि.मी., बिदरमध्ये 2 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. बेंगळूरमध्ये पुढील दोन दिवस पाऊस होण्याची शक्यता आहे. दरम्यान 6 जून रोजी राज्यात मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे 1 जूनपासून 31 जुलैपर्यंत मासेमारीसाठी बोटी समुद्रात उतरविण्यावर बंदी घालण्यात आली आहे. काही दिवसांपासून उडुपी, मंगळूर व कारवार जिल्हय़ांमध्ये पाऊस होत आहे.