गतवर्षी पुराचे संकंट, यंदा कोरोनाचे पसरली गडद छाया
प्रतिनिधी / सातारा
साताऱयातील गणेश मंडळे गणेशोत्सवात दरवर्षी सामाजिक विषय मांडत विविध समाज जागृतीचे देखावे सादर करतात. यामध्ये जिवंत देखावे आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरत असतात. परंतु गतवर्षी निर्माण झालेली पूरस्थितीमुळे देखावे सादर झाले नाहीत. चालू वर्षी कोरोनाचे संकट निर्माण झाल्याने देखावे सादर होणार नसल्याचे मंडळाच्यावतीने सांगण्यात येत आहे.
घराघरात गणरायाचे आगमन होणार म्हणून महिन्याभर आधी बाजारपेठा सजावटीच्या साहित्यांनी सजलेल्या असतात. दरवर्षी शहरातील गणेश मंडळे सामाजिक संदेश देणारे उपक्रम राबवत असतात. मात्र गतवर्षी जुलै महिन्यात पावसाचा जोर वाढल्याने सातारासह सांगली, कोल्हापूर येथे पूरस्थिती निर्माण झाली होती. या पूरामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले होते. भयान परिस्थिती निर्माण झाल्याने शहरातील गणेश मंडळांनी देखावे सादर न करता पूरग्रस्तांना मदतीचा हात दिला होता. यामुळे गतवर्षी देखावे सादर न होण्याचे पहिलेच वर्ष मानले जात असताना यंदा कोरोनाची गडद छाया गणेशोत्सवावर पसरली आहे.
मार्च महिन्यात लॉकडाऊन करण्यात आले. यामुळे जिल्हातर्गंत वाहतूक बंद झाल्याने गणेश मूर्तीसाठी कच्चा माल उपलब्ध झाला नाही. बाधित रुग्ण वाढल्याने यंदा गणेशोत्सव साजरी करण्यासाठी परवानगी मिळणार का? असा प्रश्न उपस्थित झाला होता. यामुळे मंडळांनी देखावे, सजावट न करता यंदाचा गणेशोत्सव साध्यापणाने साजरी करण्याचा निर्णय घेतला आहे. काही मंडळे सामाजिक उपक्रम राबवणार आहेत.