श्रीकांत, प्रियांशू राजावतची विजयी सलामी, लक्ष्य सेनलाही पराभवाचा धक्का
वृत्तसंस्था/ बँकॉक
येथे सुरु असलेल्या सिंगापूर ओपन बॅडमिंटन स्पर्धेत भारताची स्टार खेळाडू सायना नेहवाल, पीव्ही सिंधू, एचएस प्रणॉय, लक्ष्य सेन यांना सलामीच्या सामन्यातच पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवासह त्यांचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे. पुरुष एकेरीत मात्र किदाम्बी श्रीकांतने विजयी सलामी देत दुसऱ्या फेरीत प्रवेश केला.
मलेशियन मास्टर्स, थायलंड ओपन स्पर्धेनंतर मंगळवारपासून सिंगापूर ओपन स्पर्धेला प्रारंभ झाला. या दोन्ही स्पर्धेत अपयशी ठरलेल्या सायना नेहवाल व पीव्ही सिंधू यांना या स्पर्धेतही पराभवाचा सामना करावा लागला. जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या जपानच्या अकाने यामागुचीने माजी विजेत्या सिंधूला 21-18, 19-21, 17-21 असे नमवत पुढील फेरीत प्रवेश केला. पहिला गेम जिंकत सिंधूने दमदार सुरुवात केली होती पण दुसऱ्या व तिसऱ्या गेममध्ये तिच्याकडून अनेक चुका झाल्या. याचा फायदा घेत यामागुचीने तिला पराभूत केले. याशिवाय, महिला एकेरीच्या अन्य एका लढतीत थायलंडच्या रेचनॉक इंटेनॉनने सायना नेहवालला 21-13, 21-15 असे हरवत स्पर्धेबाहेरचा रस्ता दाखवला. युवा खेळाडू आकर्षी कश्यपलाही थायलंडच्या सुपानिदाने 21-17, 21-9 असे नमवले.
किदाम्बी श्रीकांत, राजावतची विजयी सलामी
पुरुष एकेरीतील सलामीच्या सामन्यात के. श्रीकांतने विजयी प्रारंभ करताना थायलंडच्या केंटाफॉन वांगचारोएनला 21-15, 21-19 असा पराभवाचा धक्का दिला. 35 मिनिटे चाललेल्या या सामन्यात श्रीकांतने शानदार खेळाचे प्रदर्शन साकारले. आता, त्याचा पुढील सामना चिनी तैपेईच्या चिया हाओशी होईल. याशिवाय, अन्य एका सामन्यात युवा प्रियांशू राजावतने जपानच्या कांटा सुनायामाचा 21-12, 21-15 असा पराभव केला.
स्टार खेळाडू प्रणॉय व लक्ष्य सेनला मात्र सलामीच्या लढतीत हार पत्कारावी लागली. प्रणॉयला जपानच्या कोडाई नाराओकाने 15-21, 19-21 असे तर लक्ष्य सेनला चोऊ तियानने 21-18, 17-21, 13-21 असे नमवत स्पर्धेबाहेरचा रस्ता दाखवला.
अर्जुन-ध्रुवची विजयी सलामी
पुरुष दुहेरीतील सलामीच्या सामन्यात भारताच्या अर्जुन-ध्रुव जोडीने फ्रान्सच्या लुकास कॉर्वी-रोनन लाबरचा 21-16, 21-15 असा पराभव केला. भारतीय जोडीने नेटजवळ सुरेख खेळाचे प्रदर्शन साकारताना प्रतिस्पर्धी जोडीला जराही वरचढ होण्याची संधी दिली नाही.