कृषीमंत्री रवी नाईक यांचे आवाहन : व्हीपीके अर्बनच्या फोंडा शाखेचे उद्घाटन
प्रतिनिधी /फोंडा
राज्यातील सहकारी बँका व पतसंस्थांनी कृषीक्षेत्रात पुढे येऊ पाहणाऱया युवकांना कर्ज पुरवठा करण्यासाठी सहकार्याचा हात द्यावा. ज्यामुळे त्यांच्या रोजगाराचा प्रश्न तर सुटेलच शिवाय पडिक जमिनीही उत्पादनाखाली येतील. ग्रामीण भागातील सर्वसामन्यांचा आधार असलेल्या व्हीपीके सारख्या संस्थांनी त्याकडे अधिक गांभीर्याने लक्ष घालावे, असे आवाहन कृषीमंत्री रवी नाईक यांनी केले.
व्हीपीके अर्बन सहकारी संस्थेच्या फोंडा येथील स्थलांतरीत शाखा कार्यालयाच्या उद्घाटन सोहळय़ात मंत्री रवी नाईक प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. तिस्क-फोंडा येथील मामलेदार कचेरीसमोर असलेल्या फोन्सेका इमारतीच्या तळमजल्यावर हे कार्यालय स्थलांतरीत करण्यात आले आहे. यावेळी व्यासपीठावर सहकार भारतीचे गोवा प्रांत अध्यक्ष राजकुमार देसाई, सहकार निबंधक विशांत गावणेकर, सुभाष हळर्णकर, ओबीसी महामंडळाचे अध्यक्ष ऍड. मनोहर आडपईकर, व्हीपीकेचे अध्यक्ष दुर्गादास गावडे व उपाध्यक्ष सुर्याकांत गावडे हे उपसिथत होते.
सर्वसान्यांच्या भागभांडवलातून उभी राहिलेली व्हीपीके अर्बन ही गोव्यातील एक महत्वाची संस्था आहे. आज तिचा विस्तार राज्यभर झाला असून भागधारकांच्या ठेवींची सुरक्षा तसेच कर्ज देताना काळजी घेण्याचा सल्लाही त्यांनी दिला. सर्वसामन्यांना कर्ज पुरवठा करुन त्यांना मुख्य प्रवाहात आणणे हा सहकाराचा मूळ उद्देश असून तो तळागाळात पोचला पाहिजे असे राजकुमार देसाई म्हणाले. सहकार ही प्राचीन भारतीय परंपरा असून जागतिक महामंदीच्या काळातही सहकारामुळेच देशातील अर्थव्यवस्था टिकून राहील असे सुभाष हळर्णकर यांनी सांगितले. श्री. गावणेकर यांनी नवीन शाखा कार्यालयाला शुभेच्छा दिल्या. दुर्गादास गावडे यांनी स्वागत केले. बँकेचे व्यवस्थापकीय संचालक अशोक गावडे यांनी सूत्रसंचालन तर सुर्यकांत गावडे यांनी आभार मानले.
व्हीपीकेचे भागभांडवल 33 कोटी 8 लाख
व्हीपीके अर्बन ही गोव्यातील एक नामांकीत आर्थिक संस्था असून 31 मार्च 2022 च्या अहवालानुसार व्हीपीकेचे भागभांडवल रु. 33 कोटी 8 लाख एवढे आहे. राखीव निधी रु. 28 कोटी 65 लाख, भागधारकांच्या ठेवी रु. 528 कोटी 74 लाख तर कर्जस्वरुपात रु. 402 कोटी 82 लाख वितरीत करण्यात आले आहे. संस्थेची गुंतवणूक रु. 242 कोटी 45 लाख असून राज्यभरात रु. 1 लाख 11 हजार 793 भागधारक आहेत. एकूण 37 शाखा कार्यरत असून त्यात 240 कर्मचारी काम करतात. विद्यमान संचालक मंडळाने व्हीपीके अर्बनच्या उत्कर्षासाठी विविध निर्णय घेतले असून सध्या त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे, अशी माहिती अध्यक्ष दुर्गादास गावडे यांनी दिली.