कराड / प्रतिनिधी:
जैव विविधतेने समृद्ध असलेल्या ‘सह्याद्री व्याघ्र प्रकल्पा’त अलीकडेच जंगली जयगड भागात गस्त घालत असताना वनक्षेत्रपाल स्नहेल मगर व वनरक्षक संतोष चाळके यांना दुर्मीळ ‘ग्रिफॉन गिधाड’ घिरटय़ा मारताना दिसला. त्यांनी त्याला कॅमेराबद्ध केले असून प्रथमच या गिधाडाची नोंद सह्याद्रीमध्ये झाली आहे.
हा पक्षी तिबेट, कझाकिस्तान, उझबेकिस्तान, किर्गिस्तान, ताजिकिस्तान, अफगाणिस्तान आणि पाकिस्तान ते हिमालय, नेपाळ, भूतान ते पश्चिम चीन आणि मंगोलिया, दक्षिणेकडील युरोप, उत्तर आफ्रिका या भागात मुख्यत: आढळतो. हा पक्षी हजारो किलोमीटरचा प्रवास करीत असतो. आकाशात उंच घिरटय़ा घालत आपले अन्न शोधत असतो. या पक्ष्याचे इंग्रजी नाव ग्रिफॉन वलचर व शास्त्रीय नाव गीप्स फुल्वस असे आहे. हा एक अत्यंत मोठा पक्षी असून त्याची उंच साधारणपणे 125 सें.मी. असते. तर दोन पंखांची लांबी साधारण 8 ते 9 फुटापर्यंत भरते. नर व मादी ग्रिफॉन गिधाडाचे वजन 8 ते 10 किलोपर्यंत नोंदवले गेले आहे. ही एक दुर्मिळ गिधाड प्रजाती आहे. याच्या डोक्यावर पांढरे शुभ्र पंख असतात. तर पाठीवरचे पंख फार रुंद व तांबूस असतात. शेपटीचे पंख हे चॉकलेटी असतात. इतर गिधाडांप्रमाणेच हा पक्षी कुजलेले व सडलेले मांस खाणारा आहे. उंच कडय़ांवर घरटे बनवतो.
या पक्ष्याचे छायाचित्र घेतल्यानंतर अधिक अभ्यासासाठी ते पक्षी तज्ञ व मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे यांना दिले. फोटोमध्ये सदर गिधाडावर अभ्यासासाठी उजव्या पंखावर नारंगी टॅग लावलेले दिसत आहे. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्रसंचालक समाधान चव्हाण, उपसंचालक उत्तम सावंत, साहायक वनसंरक्षक सुरेश साळुंखे, वनक्षेत्रपाल संदीप कुंभार यांनी वनक्षेत्रपाल स्नहेल मगर व संतोष चाळके यांचे या दुर्मीळ नोंदणीसाठी कौतुक व अभिनंदन केले आहे.
स्थलांतराच्या अभ्यासासाठी गिधाडाच्या पंखाला टॅग
सदर गिधाड हे शास्त्रीय व स्थलांतराच्या अभ्यासाठी कोणत्यातरी अभ्यासकाने हे टॅग लाऊन सोडलेले आहे. त्याबद्दलची माहिती घेण्यासाठी वेगवेगळ्या देशात गिधाडांवर अभ्यास करणाऱया संशोधकांना व गिधाडांवर अभ्यास करणाऱया आंतरराष्ट्रीय संस्थाना संपर्क करून त्यांना या नोंदीची माहिती आम्ही कळवली आहे.
रोहन भाटे, पक्षी तज्ञ व मानद वन्यजीव रक्षक