सहय़ाद्रि कारखान्याकडून 150 बेडच्या कोविड सेंटरची उभारणी
प्रतिनिधी/ मसूर
राज्यात ‘सह्याद्रि पॅटर्न’ म्हणून नेहमीच अग्रेसर असलेल्या कराड तालुक्यातील यशवंनगर येथील सह्याद्रि सहकारी साखर कारखान्याने सामाजिक बांधिलकी जोपासत आणि शासनाच्या आवाहनाला राज्यातून प्रथम क्रमांकाचा प्रतिसाद देत 150 बेडच्या कोविड सेंटरची उभारणी केली आहे. येत्या दोन दिवसांत हे सेंटर शासनाकडे हस्तांतरित करण्यात येणार असल्याची माहिती कारखान्याचे संचालक व युवा नेते जशराज पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
साखर कारखान्यांनी कोविड सेंटरची उभारणी करावी, असे आवाहन ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केले होते. त्यानुसार कारखान्यातर्फे कोविड सेंटर उभारण्याचा प्रयत्न जिह्यात प्रथमच ‘सह्याद्रि’ने राबवला आहे. सह्याद्रि कारखाना कार्यस्थळावर सह्याद्रि कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयात या सेंटरची उभारणी केली असल्याचे जशराज पाटील यांनी स्पष्ट केले. या कोविड सेंटरच्या उभारणीच्या कामाची पाहणी राज्याचे सहकार व पणन मंत्री तथा जिल्हय़ाचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केली असल्याचेही त्यांनी सांगितले.
जशराज पाटील म्हणाले, कोरोनाचा फैलाव दिवसेंदिवस वाढत आहे. रुग्ण संख्येच्या तुलनेत बेडची उपलब्धता होत नाही. तसेच ऑक्सिजन सुविधाही जिह्यात कमी पडू लागली आहे. त्यासाठीच या कोविड सेंटरची उभारणी करण्यात आली आहे. या सेंटरमध्ये 100 रुग्णांकरिता उपचार कक्ष तयार करण्यात आला आहे, तर 50 रुग्णांसाठी ऑक्सिजनच्या सुविधेसह स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. सेंटरमध्ये कारखान्याकडून रुग्णांना पिण्यासाठी गरम पाणी, साबण, टूथब्रश, वाफारा मशिन पुरवण्यात येणार आहेत. कारखान्याने सामाजिक बांधिलकीतून शासनाच्या आवाहनानुसार सह्याद्रि हॅण्ड सॅनिटायझरची निर्मिती एप्रिलमध्ये सुरू केली. ग्रामपंचायती, शाळा, महाविद्यालये, शासकीय कार्यालये आदींना रुपये शंभर प्रतिलिटर याप्रमाणे विक्रीची व्यवस्था केली आहे. आशा सेविका, पोलीस कर्मचाऱयांच्या सुरक्षितेसाठी दोन हजार लिटर सॅनिटायझरचे मोफत वाटप करण्यात आले आहे.
कारखान्याच्या गळीत हंगाम अखेरीस ऊसतोड मजुरांसाठी साबण, सॅनिटायझर, जीवनावश्यक वस्तू उपलब्ध करण्यात आल्या. हंगाम संपताच मजुरांची वैद्यकीय तपासणी करून त्यांना गावी पोहोचवण्याची व्यवस्था करण्यात आली. त्यांना मास्क, हातमोजे देण्यात आले, असे त्यांनी सांगितले. यावेळी कारखान्याचे कार्यकारी संचालक आबासाहेब पाटील, जनरल मॅनेजर पी. आर. यादव, सल्लागार एच. टी. देसाई, बांधकाम अभियंता वाय. जे. खंडागळे, परचेस अधिकारी जे. डी. घार्गे, फायनान्शिअल ऍडव्हायझर जी. व्ही. पिसाळ, व्ही. जे. शेलार, आर. जी. तांबे उपस्थित होते