कर्करोगावर सूक्ष्मपद्धतीचे संशोधन, : उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडुंच्या हस्ते पुरस्कार प्रदान,जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर मिळविले यश
प्रतिनिधी /पणजी
आपल्या मनात असलेले ध्येय साध्य करण्यासाठी जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर अत्यंत प्रतिकूल परिस्थितीला सामोरे जात सांखळी येथील एक युवक आज देशाचा एक शास्त्रज्ञ बनला आणि कर्करोगावर अत्यंत सूक्ष्मपद्धतीचे त्याचे संशोधन थक्क करणारे आहे. राष्ट्रीय स्तरावरचे अनेक पुरस्कार त्यांनी प्राप्त केले.
ही यशोगाथा आहे चेन्नईच्या सेंट्रल लेदर रिसर्च इन्स्टिटय़ूटचे प्रोफेसर डॉ. अमित अशोक वेर्णेकर यांची. वडील मुंबईत एका उद्योगात अधिकारी होते. सेवानिवृत्त होऊन ते गोव्यात परतले आणि एक दोन वर्षात त्यांचे निधन झाले. आपले पती अशोक नसताना त्यांच्या पश्चात श्रीमती अर्चना वेर्णेकर यांनी आपली कन्या व पुत्र अमित यांना चांगले शिकवण्याचे ध्येय बाळगले. दोन्ही मुले अभ्यासात नेहमीच हुषार. अमित हा नेहमीच वर्गात पहिला येणारा. इयत्ता अकरावीत असताना वडील गेले. मुलाने आईला व आईने मुलाला धीर दिला. अमितला शास्त्र विभागाची आवड. शिक्षणासाठी पैसा कमी पडणार हे माहीत असल्याने व आईकडे आता पैसे नाहीत हे माहीत झाल्यानंतर आपल्या हुशारीच्या ताकदीवर मनगटात बळ आणून अमितने भरपूर अभ्यास केला व शिष्यवृत्ती मिळविल्या.
पदवी प्राप्तीनंतरच चार कंपन्यांकडून ऑफर्स
बारावीमध्ये पर्ये येथील भूमिका हायरसेकंडरीत प्रवेश घेतला, तिथे शिक्षणात मन लागले. आपल्याला जीवशास्त्रामध्ये संशोधन करायचे हे त्याने मनाशी बांधून ठेवले व त्यातून केलेल्या प्रयत्नाने बारावीत घवघवीत यश संपादन केले. बायोलॉजीच्या अभ्यासासाठी खांडोळा महाविद्यालयात प्रवेश मिळविला. तिथे प्रोफेसर डॉ. श्रीधर गुरव हे मार्गदर्शक भेटले आणि तिथून रसायन शास्त्र (केमेस्ट्री) हा विषय घेऊन पुढे जायचे ठरविले. सांखळी सरकारी महाविद्यालयात विज्ञान शाखेत अंतिम वर्गात प्रवेश मिळविला. तिथेही उत्तम प्रगती झाली आणि लागलीच 4 कंपन्यांकडून ऑफर्स आल्या.
शिक्षणासाठी केलेली धडपड यशस्वी
आपल्याला काम करण्याची इच्छा नव्हती. अगोदर भरपूर शिकून घेऊन नंतरच नोकरी पत्करायची हे ठरविले. बीएसीमध्ये सर्वाधिक गुणांनी पास झाल्यावर गोवा विद्यापीठात एमएससीसाठी प्रवेश परीक्षा झाली, त्यात पहिला आलो. प्रवेश मिळविला. पहिले वर्ष पूर्ण झाले आणि उद्दिष्ट होते बंगळूरच्या इंडिया इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्समध्ये जाऊन शिक्षण घ्यायचे. त्याचवेळी विचार आला. एमआयटी अमेरिकेमध्ये जाऊन जगातल्या पहिल्या क्रमांकाच्या या संस्थेत जाऊन शिक्षण मिळवायचे. 2009 मध्ये एमएसी गोवा विद्यापीठात पूर्ण होण्याआधी बंगळूरच्या इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्समध्ये जाऊन उन्हाळी दोन महिन्यांचे प्रशिक्षण घेण्यासाठी सुरु केलेली धडपड यशस्वी झाली. त्यात प्रवेशासाठी अत्यंत कठीण परीक्षा पूर्ण केली. फेलोशिप मिळाली व शिक्षण घेतले. परत गोवा विद्यापीठात येऊन एमएससी पूर्ण केले.
अनेक राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त
त्यानंतर अमेरिकेत जाऊन पुढील शिक्षण घेण्याचे उद्दिष्ट होते, त्यासाठी अ. भा. पातळीवर परीक्षा 1 लाख पेक्षा जास्त जण परीक्षेला बसले, त्यात माझा 150 वा क्रांक आला. माझे स्वप्न होते ते पूर्ण झाले. मी अमेरिकेत जाऊन तिथे शिक्षण घेतले. पीएचडी पूर्ण केली. त्यात‘नॅनो एन्झायन्स’ तंत्रज्ञानावर संशोधन केले. हे संशोधन यशस्वी झाल्यामुळे आपल्याला अनेक राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाले. गांधीयन यंत्र टेक्नॉलॉजीकल इनोव्हेशन अवॉर्ड 2015 ने आपल्याला सन्मानित करण्यात आले. डॉ. अमितने ही माहिती दिली. एसएसडीएफ 2016 उत्कृष्ट वेज्ञानिक व संशोधन हा मिसिगन अमेरिकेचा प्रतिष्ठेचा पुरस्कार प्राप्त झाला. उत्कृष्ट पीएचडी पीसीसच्या प्रो. सांरशराजन सुवर्ण पदक पुरस्कार देखील डॉ. अमित यांना प्राप्त झाला. अलीकडेच उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते हा पुरस्कार अमितला प्रदान करण्यात आला.
अनेक संघर्ष करीत बनला कर्करोग शास्त्रज्ञ
गोव्याच्या या विद्यार्थ्याने आपल्या सखोल अभ्यासाने व संशोधनाद्वारे अनेकांना चकित केले. आज डॉ. अमित चेन्नई येथील केंद्र सरकारच्या लेदर रिसर्च इन्स्टिटय़ूटमध्ये वैज्ञानिक म्हणून काम पहातात. वय 36 असले तरी आज त्यांच्या हाताखाली 4 विद्यार्थी पीएचडीचे शिक्षण घेत आहेत. आर्थिक परिस्थिती गरीबीची. वडील नाहीत. असे असताना देखील केवळ आपल्या मनातील स्वप्न साकार करण्यासाठी अनेक संघर्ष करीत जिद्द आणि चिकाटीने अमित वेर्णेकर हा विद्यार्थी आज देशाचा कर्करोग संशोधन व शास्त्रज्ञ बनला.
मुळात एवढा मोठा शास्त्रज्ञ बनल्यानंतरही डॉ. अमित वेर्णेकर यांचे पाय आजही जमिनीवरच आहे. विद्या विनयेन शोभते म्हणतात ते उगाच नाही. डॉ. अमितने मनात ठरविले व ते करून दाखविले.
स्वप्न उराशी बाळगून पुढे जावे : अमित वेर्णेकर
आजच्या विद्यार्थ्यांनी स्वप्न उराशी बाळगून पुढे जावे. सर्वात प्रथम आपला पाया मजबूत करा. पाया मजबूत असला तर केवढीही मोठी इमारत उभी राहू शकते. आपली यशोगाथा गोव्यातील युवावर्गाला प्रेरणा देणारी आहे. कर्करोग प्रकरणी नॅनॉ एन्झायन्सचे संशोधन आपण करतोय. त्याला निश्चितच यश प्राप्त होईल, असे डॉ. अमित अशोक वर्णेकर म्हणाले.