नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी
सांगली / प्रतिनिधी
महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांना निलंबित करा, अशी मागणी राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करण्यात आली आहे. मंत्री शिंदे यांना याबाबतचे निवेदन देण्यात आले आहे, अशी माहिती काँग्रेसचे माजी अल्पसंख्याक अध्यक्ष जावेद शेख, प्रवक्ता संतोष पाटील यांनी दिली.
नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सांगलीत दोन वर्षांपूर्वी आलेल्या महापुरात नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले. या महापुराच्या कालावधीत स्थलांतरीत नागरिकांची बोगस बिले काढणे, जेवणाच्या बोगस बिलामध्ये झालेला भ्रष्टाचार, नागरिकांशी उद्धट वागणे, नागरिकांनी दिलेल्या निवेदनास व्यवस्थित उत्तर न देणे, कोरोना कालावधीत झालेला भ्रष्टाचार, साधनसामग्री नसताना अव्याहतपणे हॉस्पिटलला दिलेली परवानगी, त्यामुळे निर्माण झालेले मृत्यूचे तांडव, भोबे गटार संबंधीचा प्रश्न प्रलंबित ठेवणे या सर्व गोष्टींना आयुक्त कापडणीस हेच जबाबदार आहेत.
त्यांना निलंबित करुन त्यांच्या कारभाराची चौकशी करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. जावेद शेख यांच्या नेतृत्वाखाली मंत्री शिंदे यांच्या मुंबईतील निवासस्थानी जाऊन याबाबतचे निवेदन देण्यात आले. यावेळी अंजुम शेख, प्रियंका पाटील, अनिता शिंदे, अर्जुन पवार, किशोर पाटील व कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते.