प्रतिनिधी / इस्लामपूर
वाळवा तालुक्यातील ओझर्डे येथील शेतकरी अशोक यशवंत तोडकर(४५)यांचा सर्पदंशाने मृत्यू झाला. ही घटना सोमवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास घडली. तोडकर हे आपल्या शेतात काम करीत होते. दरम्यान त्यांच्या उजव्या पायास गुडघ्याजवळ विषारी सर्पाने दंश केला.
तोडकर यांना त्यांचा पुतण्या अमोल याने तात्काळ सांगली सिव्हील हॉस्पिटलमध्ये हलवले. पण त्यापूर्वीच अशोक तोडकर यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी सिव्हील हॉस्पिटलचे डॉ. प्रभाकर पाटील यांनी इस्लामपूर पोलीस ठाण्यात वर्दी दिली. तोडकर यांच्या मृत्यूने ओझर्डे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.