एड्स रोगावरील औषधे विक्रीत फसविले
प्रतिनिधी / मिरज
एड्स रोगावरील औषधे खरेदी-विक्रीतून मोठ्या प्रमाणात नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून विपुल भास्कर पेखले (वय 41, मूळ गाव माडसांगवी जि. नाशिक, सध्या रा. एफ 2, निर्मल अपार्टमेंट, एमआयडीसी रोड, सन्मान हॉटेलच्या पाठीमागे, मिरज) यांना 24 लाख, 70 हजार रुपयांचा गंडा घालण्यात आला आहे. याबाबत पेखले यांनी महात्मा गांधी चौकी पोलिसात फिर्याद दिली असून, कुलदीप श्रीवास्तव (रा. लखनौ, उत्तर प्रदेश) याच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.
श्रीवास्तव याने विपुल पेखले यांना एड्स रोगावरील औषधे विक्रीतून नफा मिळवून देतो, असे म्हणून व्यवसायात भागीदार करून घेतले होते. यासाठी पेखले यांनी वेळोवेळी आरटीजीएस व ऑनलाईन बँकींगच्या माध्यमातून 44 लाख, 69 हजार रुपये पाठविले होते. मात्र, श्रीवास्तवने यापैकी नफ्याची रक्कम 19 लाख, 99 हजार रुपये परत दिले. उर्वरीत 24 लाख, 70 हजार रुपये देण्यास टाळाटाळ केली. त्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे विपुल पेखले यांच्या लक्षात आले. याबाबत त्यांनी महात्मा गांधी चौकी पोलिसात फिर्याद दिली आहे.