प्रतिनिधी / आटपाडी
बैलगाडी शर्यतीच्या निमित्ताने हॉटस्पॉट बनलेल्या झरे गावासह ९ गावांमध्ये मंगळवार मध्यरात्रीपासून संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
सर्वोच्च न्यायालयाने बैलगाडी शर्यतीला बंदी घातली असून कोविड प्रादुर्भावही गंभीर आहे, अशा स्थितीत आमदार गोपीचंद पडळकर यांनी आयोजित केलेल्या बैलगाडी शर्यतीमुळे समस्या निर्माण होणार असल्याने जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांनी कलम १४४ लागू करत संचारबंदीचे आदेश दिले आहेत.
भाजप नेते आमदार गोपीचंद पडळकर यांनी शुक्रवार दिनांक २० ऑगस्ट रोजी झरे येथे बैलगाडी शर्यतीचे आयोजन केले आहे. त्यामुळे मोठा संघर्ष शर्यती पूर्वी उफाळून येत आहे. बैलगाडी शर्यतीला कोर्टाने बंदी घातली असतानाही शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे ही शर्यत रोखण्यासाठी प्रशासन गतिमान उपायोजना करत आहे. झरे, पिंपरी बुद्रुक, विभूतवाडी, कुरुंदवाडी, पडळकरवाडी, निंबवडे, घाणंद, जांभुळणी, घरनिकी या गावच्या सीमा हद्दीत प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून कलम १४४ (१) अन्वये प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे या ९ गावांमध्ये संचारबंदी लागू झाली आहे. त्याचे उल्लंघन करणाऱ्या वर कडक कारवाईचे निर्देश पोलीस प्रशासनाला देण्यात आले आहेत.