प्रतिनिधी / तासगाव
तासगाव शहरातील वाहतूक कोंडी, नागरिकांची रस्ता सुरक्षा प्रस्तापित होण्यासाठी, मोटार वाहनांची होणारी गर्दी तसेच होणारे अपघात टाळण्यासाठी पोलीस अधीक्षक दिक्षीत गेडाम यांनी शाळा कॉलेज, ग्राहक पंचायत, व्यापारी, स्वयंसेवी संस्था इत्यादी लोकांनी वेळोवेळी केलेल्या सूचना गृहीत धरून तासगाव शहरात सर्व वाहनांना वाहतूकीसाठी एक दिशामार्ग, प्रवेश बंद इत्यादी सुविधा प्रदान करण्याबाबत जाहीरनामा प्रसिध्द केला आहे.
तासगाव शहरातील एक दिशा मार्ग व प्रवेश बंदचे मार्ग पुढीलप्रमाणे. एक दिशा मार्ग – हनुमान मंदिर – बोथरा हॉस्पीटल – मिरज वेस मार्गे सांगली नाका, सांगली नाका – गणपती मंदिर चौक – हनुमान मंदिर, गणपती मंदिर ते वंदेमातरम चौक. नो एन्ट्री प्रवेश बंद – विटा रोड कडील स्टॅण्ड जवळील मार्केट यार्ड प्रवेश गेट मधून चार चाकीसाठी प्रवेश बंद, मार्केट यार्ड ते बागवान चौक चार चाकी वाहनास प्रवेश बंद, वंदेमातरम चौक ते गणपती मंदिर चार चाकी वाहनासाठी प्रवेश बंद, पोस्ट ते गणपती मंदिर सर्व वाहनांसाठी प्रवेश बंद, गणपती मंदिर ते घिसाडी पुल मार्गे जयहिंद चौक चार चाकी वाहनांसाठी प्रवेश बंद, सेंट्रल स्कुल बोळ (डी. एड. कॉलेज) पासून गणपती मंदिराकडे जाण्यास प्रवेश बंद आहे.
मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 33 पोट कलम 1(ब) अन्वये वरील नमुद ठिकाणी दर्शविल्याप्रमाणे हा जाहिरनामा दि. 1 ते 15 नोव्हेंबर 2021 पर्यंत प्रायोगिक तत्वावर राबविण्यात येत आहे. वाहन चालकांनी व जनतेने वाहतुक नियोजनास सहकार्य करावे व हरकती, सुचना पोलीस अधीक्षक कार्यालयास पाठवाव्यात, जेणेकरून प्राप्त झालेल्या सूचनांचे अवलोकन केल्यानंतर वाहतूक नियोजनात योग्य ते बदल करण्यात येतील, असे आवाहन पोलीस अधीक्षक दिक्षीत गेडाम यांनी केले आहे.