प्रतिनिधी / सांगली
शिराळा तालुक्यातील निगडी येथील 23 वर्षीय ‘त्या’ युवतीच्या भावाचा स्वॅब शनिवारी निगेटिव्ह आला आहे. तर या युवतीवर इस्लामपुरात उपचार करणारे डॉक्टर आणि त्यांचा स्टाफ असे सात जणांचे स्वॅब निगेटिव्ह आले आहेत. तर या युवतीचे कुटुंबीय पाच जणांपैकी चार जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. हे सर्वजण मिरजेतील संस्था क्वारंटाईनमध्ये आहेत. तर या युवतींच्या संपर्कात आलेले इतर 14 नातेवाईक शिराळा येथे क्वारंटाईन करण्यात आले असून त्यांचाही स्वॅब घेण्यात आले आहेत. अद्यापही 15 अहवाल येणे बाकी आहेत. दरम्यान या युवतीला आणि तिच्या भावाला मुंबईतून घेवून येणारे शिराळा येथील चारजण तसेच कोरोनाबाधित युवती असे मिळून पाचजणांवर शिराळा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
26 जणांचे स्वॅब तपासणीसाठी
शिराळा तालुक्यातील निगडी येथे मुंबईतून एक युवती आणि तिचा भाऊ 16 एप्रिल रोजी आले. त्यानंतर या युवतीला ताप आल्याने ती इस्लामपूर येथील एका खासगी दवाखान्यात दाखल झाली त्यावेळी तिच्यावर या डॉक्टरांनी उपचार केले तसेच तिला औषधेही दिली पण या औषधाने तिची प्रकृती सुधारली नसल्याने आणि ती मुंबईतून आल्याचे असल्या कारणावरून तिची रवानगी इस्लामपूर येथील संस्था क्वारंटाईनमध्ये करण्यात आली. त्यावेळी तिचा स्वॅब घेण्यात आला. गुरूवारी स्वॅब घेतल्यावर शुक्रवारी तिचा स्वॅब पॉझिटिव्ह आला. त्यामुळे तातडीने तिच्या कुटुंबांतील पाच व्यक्ती व तिचा भाऊ आणि तिच्यावर उपचार करणारे इस्लामपूर येथील डॉक्टर आणि त्यांचा स्टाफ असे एकूण 12 जणांना मिरजेत आणण्यात आले. या 12 जणांचे स्वॅबही घेण्यात आले असून यातील 11 अहवाल आले आहेत. हे 11 अहवाल निगेटीव्ह आले आहेत. तर एकाचा अहवाल येणे बाकी आहे. शिराळा येथे ठेवण्यात आलेल्या युवतींचे नातेवाईक आणि तिच्या संपर्कात आलेल्या इतर 14 जणांचे स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आले आहेत.
गुन्हे दाखल
देशात सर्वत्र लॉकडाऊन सुरू आहे. हा लॉकडाऊन असतानाही ही युवती आणि तिचा भाऊ मुंबईतून निगडी येथे कसे आला त्याचा पोलिसांच्याकडून तपास काढला असता. निगडी येथील प्रदीप सदाशिव पाटील यांनी त्यांच्या चुलतीवर मुंबईत कर्करोगावर उपचार करण्यासाठी नेण्यास त्यांनी ऑनलाईन पास काढला होता. हा पास फक्त हा रूग्ण पोहोचविण्यासाठी होता. प्रदीप पाटील, गणपती पांडुरंग भालेकर, चालक संतोष साळुखे, हे तिघे हा रूग्ण पोहोचविण्यासाठी गेले होते. पण मुंबईतून परत येताना त्यांनी या युवतीला आणि तिच्या भावाला या स्कॉर्पिओ एमएच 10 सीएन 8787 यातून निगडी येथे आणले त्यामुळे या कोरोनाबाधित युवती व तिचा भाऊ आणि या तिघांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांना तातडीने शिराळा येथे संस्था क्वारंटाईन करण्यात आले आहे.
आता थेट कारवाई
खेराडे वांगी येथे मुंबईतून कोरोनाबाधित रूग्ण आणून त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यामुळे जिल्हय़ात कोरोनाचे भय वाढले आणि या अंत्यसंस्काराला उपस्थित राहिलेल्या 30 जणांना संस्था क्वारंटाईन करण्यात आले. हा मृतदेह खेराडे वांगी येथे का आणला? याची चौकशीची मागणी आणि कारवाईची मागणी करण्यात आली आहे. त्यातच शिराळा निगडी येथे ही युवती आणि तिचा भाऊ मुंबईतून आला ते एका खासगी स्कॉर्पिओमधून त्यामुळे या स्कॉर्पिओचा परवाना घेणाऱया आणि त्यातून प्रवास करणाऱया सर्वांच्याविरोधात शिराळा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यामुळे यापुढील काळात जिल्हय़ाला वेठीस धरणाऱयांविरोधात आता गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचे पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी सांगितले.
कामेरी, कासेगावमधील बाधितांच्या संपर्कातील क्वारंटाईन
सातारा जिल्हय़ातील कराड येथील कृष्णा हॉस्पिटल येथे काम करणाऱया कामेरी आणि कासेगाव येथील दोघांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. त्यांच्यावर कृष्णा हॉस्पिटल येथे उपचार सुरू आहेत. त्यांना 21 एप्रिल रोजी कराड येथे दाखल करण्यात आले होते. त्यांचे स्वॅब शनिवारी आल्यावर त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू केले आहेत. या दोघांच्या संपर्कातील आणि कुटुंबांतील जवळच्या लोकांना संस्था क्वारंटाईन करण्यात आले आहे. या दोन्ही गावातही 100 टक्के लॉकडाऊन करण्यात आले असून या भागात औषध फवारणी सुरू करण्यात आली आहे. या गावांतही सर्व्हे करण्याचे आदेश देण्यात आले असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. चौधरी यांनी दिली.