प्रतिनिधी / सांगली
कृष्णा नदीवरील आयर्विन पूल फूटपाथ दुरूस्तीसाठी २३ फेब्रुवारी ते २४ मार्च या कालावधीसाठी वाहतुकीस बंद करून वाहतूक सांगली-बायपास मार्गावरून वळविणे व वाहतुक सुरक्षा उपाययोजनाद्वारे वाहतूक नियंत्रित करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी दिले आहेत.
आयर्विन पूल फुटपाथ खराब झाला आहे. याची दुरूस्ती केली जाणार आहे. यासाठी वाहतूक बंद ठेवली जाणार आहे. यामुळे जनतेच्या व वाहन चालकांच्या माहितीसाठी योग्य ठिकाणी दिशाचिन्हे व माहिती लावण्यात यावी. या उपाययोजना कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग व पोलीस अधीक्षक सांगली, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, सांगली यांनी एकत्रितपणे कराव्यात.
पेठ सांगली मिरज-म्हैसाळ रस्ता (सांगलीवाडी नजीक) आयर्विन पुलावरून वाहतुकीसाठी प्रतिबंध केल्याबाबतची माहिती जनतेला होण्यासाठी शहरात महत्त्वाच्या सार्वजनिक ठिकाणी ही अधिसूचना, उपलब्ध पर्यायी मार्गाच्या माहितीसह व्यापक प्रमाणात प्रसिद्धी द्यावी. निर्णयाची तत्काळ प्रभावी व संपूर्ण अंमलबजावणी करण्यात यावी, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी दिले आहेत.