प्रतिनिधी / सांगली
पेठनाका-सांगली-मिरज हा राष्ट्रीय महामार्ग क्र. १६६ एच सांगली शहरातून जातो. यातील सांगली ते मिरज या रस्त्याच्या दर्जोन्नती प्रकल्पाच्या कामास प्राधान्याने मंजूरी मिळावी अशी मागणी भाजपचे आमदार सुधीर गाडगीळ यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे. आमदार गाडगीळ यांनी दिल्लीत नितीन गडकरी यांची भेट घेऊन त्यांच्याशी पेठ नाका ते मिरज या राष्ट्रीय महामार्गा बाबत चर्चा केली. यावेळी नगरसेवक आणि भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष धीरज सूर्यवंशी, चिटणीस विश्वजीत पाटील उपस्थित होते. केंद्र शासनाने पेठनाका-सांगली-मिरज हा एकूण ५५ किलोमीटर लांबीचा राष्ट्रीय महामार्ग ( क्र. १६६ एच) असा घोषित केला आहे. त्यापैकी पेठनाका ते सांगली हा ४१ किलोमीटर लांबीचा भाग एक आहे. या रस्त्याचे कॉक्रीट रस्त्याने दर्जेन्नती करण्याचे काम वाहतूक व महामार्ग विकास मंत्रालयाने सन २०२१-२२ च्या वार्षिक आरखड्यामध्ये समाविष्ट केले आहे.
या कामाचा प्रकल्प अहवाल राष्ट्रीय महामार्गाच्या प्रादेशिक विभागाने आपल्या मंत्रालयाकडे सादर केला आहे. त्याला लवकर मंजूर मिळून प्रत्यक्ष लवकर सुरू व्हावे अशी मागणी केली. तसेच भाग-२ अंतर्गत सांगली ते मिरज या सुमारे १४ किमीच्या रस्त्याच्या दर्जोन्नतीबाबतच्या कामाच्या दृष्टीने अद्याप कोणतेही नियोजन शासनस्तरावर अंतिम झालेले नसल्याचे समजते. सदर लांबीतील महामार्गाच्या विकासाकरिता प्रकल्प अहवाल बनवण्यासाठी तांत्रिक सल्लागार संस्थेची नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचे काम हि प्रगती पथावर आहे. सदर प्रकल्प अहवाल तातडीने पूर्ण करून सांगली ते मिरज या १४ किमी लांबीच्या रस्त्याचे कॉक्रीट रस्त्याने दर्जोन्नती करण्याचे काम वाहतूक व महामार्ग विकास मंत्रालयाच्या सन २०२१-२२ च्या वार्षिक आरखड्यामध्ये समाविष्ट करून त्यास मंजूरी द्यावी.
व सांगली ते मिरज या भाग-२ चेही काम प्राधान्याने केंद्र शासनामार्फत लवकर विकसित होण्याच्या दृष्टीने आवश्यक ती कार्यवाही करावी तसेच राष्ट्रीय महामार्ग क्र. १६६ च्या कोल्हापूर – सांगली विभागाच्या चौपदरीकरणाचे विकास आराखडा लवकर पूर्ण करा. तसेच २०२१ रोजी कृष्णा नदीला आलेल्या महापुराने सांगली व इनामधामणी गावाला पुराच्या पाण्याचा निचरा करण्यासाठी राष्ट्रीय महामार्गवर पाईप ऐवजी बॉक्स कल्व्हर्ट बांधणे गरजेचे आहे त्याबाबत माहिती दिली व तसे काम व्हावे अशी विनंती गडकरी यांच्याकडे केली.