प्रतिनिधी / सांगली
‘ब्रेक द चेन ‘ या मोहिमेअंतर्गत कोरोना रुग्णांची साखळी तोडण्याच्या दृष्टीने राज्य शासनाने घोषित केलेल्या मिनी लॉकडाउनची जिल्ह्यात कडक अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने जिल्हा प्रशासन व महापालिका यांनी पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. महापालिका व पोलिस प्रशासन यांच्यावतीने सांगली शहरामध्ये अत्यावश्यक वगळता इतर सर्व दुकाने बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मंदिरे बंद ठेवण्यात आले आहेत. शाळा-कॉलेज ही तीस तारखेपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
मध्यवर्ती बसस्थानकावर विना मास्क फिरणाऱ्या लोकांच्यावर दंडात्मक कारवाई सुरू करण्यात आली आहे. व्यापारी वर्गातून मात्र या टाळेबंदीला विरोध दर्शविण्यात आला असून सराफ व्यावसायिकांनी सकाळी 11 ते सायंकाळी सात या वेळेत दुकाने सुरू ठेवण्याची मागणी केली आहे. शहरातील सलून आणि ब्युटी पार्लर ही बंद ठेवण्यात आली आहेत. आठवडा बाजार बंद असून भाजी मंडई मात्र सुरू आहे.