फेसबूक, व्हॅटस्ऍप, ट्विटरवर अश्लिल पोस्ट टाकल्या, पुण्यातील एकावर गुन्हा
प्रतिनिधी / मिरज
फेसबूक आणि व्हॅटस्ऍपवर अश्लिल मजकूर टाकून मिरजेतील तीन महिलांची बदनामी करण्यात आली आहे. याबाबत पिडीत महिलांनी मिरज शहर पोलिसात धाव घेऊन संदीप कोसन्ने (वय 39, रा. बी 205 अलायन्स निसर्ग सोसायटी, चौधरी पार्क वाकड, पुणे) याच्या विरोधात तक्रार दिली आहे. अश्लील मजकूर टाकून बदनामी करण्यासह विनयभंग करण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार महिलांनी दिली असून, पोलिसांनी पिडीतांच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत शहर पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी, पुणे येथे राहणाऱ्या संदीप कोसन्ने याने मिरजेतील तिघा महिलांना फेसबूकवर फेंड रिक्वेस्ट पाठवली. त्यानंतर फेसबूक आणि व्हॅटस्ऍप स्टेटसवर सदर महिलांना लज्जा उत्पन्न होईल, अशी पोस्ट टाकली. याशिवाय गुरूवारी रात्री पावणे दहाच्या सुमारास ट्वीटरवरही पोस्ट टाकली.
संदीप कोसन्ने नामक व्यक्तीने सोशल मिडीयाच्या माध्यमातून आपल्याबाबत अश्लिल पोस्ट टाकून विनयभंग करण्याच्या उद्देशाने बदनामी केल्याची बाब सदर महिलांच्या लक्षात आली. त्यांनी सदर व्यक्तीच्या फेसबूक प्रोफाईलवर जावून सविस्तर माहिती मिळविली. त्यानुसार मिरज शहर पोलिसात तक्रार देण्यात आली आहे. पोलिसांनी संदीप कोसन्ने याच्या विरुध्द गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, त्याच्या शोधासाठी पोलिसांचे एक पथक पुणे येथे रवाना झाले आहे.