शिराळा / प्रतिनिधी
पुणे – बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर इटकरे फाटया नजीक काल अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा जागीच मृत्यू झाला होता. याबाबत माहिती मिळताच वनपाल , वनरक्षक , वनमजूर यांनी घटनास्थळी पोहचून दीड वर्षीय मादी जातीचे मृत बिबट वन्यप्राण्याचे कलेवर पंचनामा करून ताब्यात घेतले . मृत बिबट्याचे शवविच्छेदन करून, मृतदेहाची रितसर विल्हेवाट लावली आहे.
२९ जानेवारी रोजी रात्री १०:४५ च्या सुमारास अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या चा मृत्यू झाला होता. याबाबत स्थानिक वन्यजीव प्रेमी व ग्रामस्थ यांनी दिलेल्या माहिती नुसार , शिराळा प्रादेशिक वनपरिक्षेत्र अधिकारी एस. आर. काळे यांनी दखल घेऊन, या प्रकरणी वनगुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सुरू आहे .
30 जानेवारी रोजी डॉ . श्री. अंबादास माइकर , पशूवैदयकीय अधिकारी , वाळवा यांचे कडून मृत बिबटचे शवविच्छेदन करण्यात आले आहे. अज्ञात वाहनाने धडक दिल्यामूळे अंतर्गत रक्तस्त्राव झाल्यामूळे सदर वन्यप्राणी मृत झाल्याचा अंदाज पशुवैदयकीय अधिकारी यांनी वर्तविला आहे . वन्यजीव अधिनियमातील तरतुदीनुसार शवविच्छेदनानंतर अग्नी देवून मृत प्राण्याचे अवयवाची विल्हेवाट लावण्यात आली आहे . परिमंडळ अधिकारी अमोल शिंदे , वनरक्षक कु . रायना पाटोळे , वन्यजीव प्रेमी श्री. मणेर , महामार्ग पोलीस तसेच कुरळप पोलीस यांनी प्रसंगी मदत केली आहे .