सरासरी दर आठ ते दहा हजार : आत्तापर्यंत आठ लाखांवर पोत्यांची आवक
प्रतिनिधी / सांगली
हळदीसाठी प्रसिध्द असलेल्या सांगलीच्या वसंतदादा पाटील मार्केट यार्डात दररोज तब्बल 25 ते 30 हजार पोती हळदीची आवक होऊन सौद्यात विक्री होत आहे. दीड महिन्यापासून हळदीची आवक सुरू झाली असून आत्तापर्यंत सुमारे आठ लाख पोत्यांची आवक झाली असून हंगाम अर्ध्यावर गेला असल्याचे व्यापाऱ्यांतून सांगण्यात आले.
यंदाचा हळद हंगाम सुरू होवून दीड महिना होऊन गेला. सध्या मोठ्या प्रमाणात यार्डात हळद विक्रीला येत आहे. हळदीची पेठ हळदीच्या पोत्यांनी फुल्ल झाली आहे. हळदीची आवक वाढत असल्याने बाजार समिती प्रशासनानेही रविवार वगळता आठवडाभर सौदे काढण्यास सुरूवात केली आहे. दिवसातून सकाळी आणि संध्याकाळी असे दोन टप्प्यात सौदे निघत आहेत. या सौदयात तब्बल रोज 25 ते 30 हजारावर पोत्यांची आवक होऊन विक्री होत आहे. आत्तापर्यंत तब्बल आठ लाख इतकी हळद पोत्यांची आवक झाली असून यामध्ये राजापुरी सहा लाख 26 हजार तर परपेठ एक हजार पोत्यांची आवक झाली असल्याचे सांगण्यात आले. राजापुरी, कडपा, सेलम आणि परपेठ हळदीची आवक मोठी आहे. सुरू असलेला हंगाम सध्या मध्यावर आला आहे. आणखी किमान दीड महिने हंगाम सुरू राहण्याची शक्Îता असून या हंगामात अखेरपर्यंत किमान पंधरा ते 20 लाख पोत्यांवर हळदीची आवक होण्याची शक्यता व्यापाऱयांतून व्यक्त केला जात आहे.
दरम्यान, यार्डात सुरू असलेल्या हळद सौद्याबाबत बाजार समितीचे सभापती दिनकर पाटील व सचिव महेश चव्हाण म्हणाले, हळदीसाठी सांगलीची पेठ महत्वाची आणि प्रसिध्द आहे. यामुळेच यार्डातील सौद्यात वर्षाला लाखो पोत्यांची हळदीची आवक होते, यंदाच्या हंगामाही मोठ्या प्रमाणात हळदीची आवक होत आहे, दरही आठ हजारापासून 30 हजारापर्यंत मिळत आहेत. शेतकऱ्यांनी यार्डातील सौद्यात जास्तीत जास्त हळद विक्रीला आणावी.
हळदीच्या उत्पादनात घट
हळदीसाठी सांगलीची बाजारपेठ प्रसिध्द आहे. येथील हळदीला जगभरातून मागणी आहे. हळदीच्या उत्पादनासह उच्चदर्जाची हळद पावडर येथे तयार होते. हळद मिल असुन लाखो क्विंटल हळदीची वर्षाला आवक-जावक होते. विशेष करून आंध्र, तामिळनाडू, कर्नाटक, आदी ठिकाणीहून मोठ्या प्रमाणात हळद येथे विक्रीला येते, हळदीला चांगला दर मिळत असल्याने तसेच शेतकऱ्यांनाही विश्वासाने व्यापाऱयांकडून पैसे मिळत असल्याने हळद व्यापार आणखीनच वाढताना दिसत आहे. असले तरी प्रति वर्षाप्रमाणे यंदा हळदीचे उत्पादन आले नाही. एकराला 20 ते 25 क्विंटल हळदीचे उत्पन्न निघते यंदा मात्र यामध्ये पाच ते सात क्विंटलची घट झाली असून यामुळे एकूण आवकेतही घट झाली आहे.