प्रतिनिधी / मिरज
राज्यातील महाविकास आघाडी सरकारने वाढीव वीजबिल संदर्भात कोणतीही सवलत न देता जनतेला संपूर्ण बिले भरण्याबाबत आदेश काढले आहेत. या नाकर्त्या सरकारच्या विरोधात मिरज शहर भाजपच्या वतीने सोमवारी आंदोलन करण्यात आले. आमदार सुरेश भाऊ खाडे, भाजपचे जिल्हाध्यक्ष दिपकबाबा शिंदे यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले.
महाविकास आघाडी सरकारने सत्तेत आल्यावर 100 दिवसात 100 युनिट पर्यंत मोफत वीज देतो म्हणून फसवी घोषणा केली. लॉकडाऊन काळातील वाढीव वीजबिल माफ करतो असे जाहीर केले. पण आज बिल भरण्याचा जाचक आदेश काढला आहे. या शासनाने खोटी आश्वासने देऊन जनतेची फसवणूक केली आहे. या फसव्या तिघाडी सरकारचा निषेध. भाजपा आंदोलन तीव्र करून झोपलेल्या सरकारला जाग आणून वीजबिल माफ केल्याशिवाय गप्प बसणार नाही, असा इशारा यावेळी आमदार खाडे यांनी दिला.