कुपवाड / प्रतिनिधी
माधवनगर परिसरातील संजय इंडस्ट्रीयल इस्टेटमधील व्यंकटेश टेक्टाईल (प्लॉट नंबर- ७) या कंपनीवर सांगलीच्या जीएसटी अधिकाऱ्यांनी छापा टाकून कागदपत्रांची तपासणी केली. यावेळी तपासणी करत असताना कंपनीच्या मालकाने जीएसटी अधिकाऱ्यांच्या हातातील कागदपत्रे हिसकावुन घेऊन फाडून टाकली.
याशिवाय मालकाने अधिकाऱ्यांना मारहाण करत धमकावून कंपनीतुन जबरदस्तीने कंपनी बाहेर हाकलून लावले. हा खळबळजनक प्रकार गुरुवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास घडला असून याप्रकरणी कंपनीमालक नीरजकुमार सुभाषचंद्र गुप्ता यांच्याविरोधात कुपवाड पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत व्यवसाय कर अधिकारी शैलेंद्र जगन्नाथ पेंढे (वस्तु व सेवाकर कार्यालय, सांगली) यांनी फ़िर्याद दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, माधवनगर परिसरात संजय इंडस्ट्रीयल इस्टेटमध्ये उद्योजक नीरजकुमार सुभाषचंद्र गुप्ता यांची व्यंकटेश टेक्टाईल या नावाने कंपनी आहे. या कंपनीवर गुरुवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास सांगलीच्या जीएसटी कार्यालयातील निरीक्षक शिवराज नथुराम भोईटे, व्यवसाय कर अधिकारी शैलेंद्र जगन्नाथ पेंढे यांसह अन्य अधिकाऱ्यांनी छापा टाकला. कर निर्धारण निरिक्षणा संदर्भात अधिकाऱ्यांनी कंपनीच्या कार्यालयातील कागदपत्रांची तपासणी सुरु केली. यावेळी तपासणी करत असताना कंपनी मालकाने रागाने अधिकाऱ्यांच्या हातातील कागदपत्रे व फाईली जबरदस्तीने हिसकावुन घेऊन तपासणी पथकातील अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांना कंपनीबाहेर हाकलुन लावले.
शिवाय अधिकाऱ्यांसमोरच मालकाने कर निर्धारणाची महत्वाची सरकारी कामाची कागदपत्रे फाडून फेकून दिली. एवढ्यावरच थांबले नाही तर मालकाने ‘त्या’ अधिकाऱ्यांना अरेरावी व दमदाटी करून तपासणी कामात असहकार्य केले. शासकीय कामात अडथळाही आणला. हा प्रकार बराचवेळ सुरु होता. याबाबत जीएसटी विभागाच्या अधिकाऱ्यांनी कुपवाड पोलिसांत धाव घेऊन कंपनीमालक नीरजकुमार सुभाषचंद्र गुप्ता यांच्याविरोधात फ़िर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला. उद्योजक गुप्ता यांना लवकरच अटक करणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. अधिक तपास सपोनि नीरज उबाळे करीत आहेत.