दोन्ही ठिकाणाहून 20 लाखांचा ऐवज लुटला
सांगली प्रतिनिधी
शहरातील गजबजलेल्या गणेशनगर परिसरातील बंद बंगला फोडून 19 लाखांचा आणि संजयनगर परिसरातील शाहूनगर येथील बंद फ्लॅट फोडून दीड लाखांचा ऐवज चोरटय़ांनी पळवून नेला आहे. दोन्ही ठिकाणाहून 20 लाखांचा ऐवज लंपास करण्यात आला आहे. याप्रकरणी या दोन्ही घर मालकांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्या आहेत.
गणेशनगर बंगला फोडून 19 लाखांचा ऐवज लंपास
शहरातील गणेशनगर येथील चौथ्या गल्लीतील पंचदीप निवास हा बंगला फोडून चोरटय़ाने 2 लाख रुपयांच्या रोख रक्कमेसह सोन्या-चांदीचे दागिने असा 19 लाख 33 हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. 5 ते 7 मार्च दरम्यान हा प्रकार घडला. याबाबत सुंदर लखमेचंद तिग्यानी (45, रा. गणेशनगर, सांगली) यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी अज्ञात चोरटय़ावर गुन्हा दाखल केला.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी सुंदर तिग्यानी यांचा गणेशनगर येथील चौथ्या गल्लीत पंचदीप निवास हा बंगला आहे. 5 ते 7 मार्च रोजी बंगला बंद होता. तिग्यानी हे मुंबईला गेले होते. या दरम्यान चोरटय़ांनी बंगल्याच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडून बंगल्यात प्रवेश केला. बंगल्यातील साहित्य अस्ताव्यस्त करुन कपाटातील 2 लाख रुपये रोख आणि सोन्याचांदीचे दागिने असा 19 लाख 33 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेला. 7 मार्च रोजी रात्री हा प्रकार उघडकीस आला. याबाबत सुंदर तिग्यानी यांनी सांगली शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. चोरीच्या घटनेनंतर उपाधीक्षक अजित टिके, शहर ठाण्याचे निरीक्षक अजय सिंदकर यांनी घटनास्थळी भेट दिली. श्वानपथकालाही पाचारण करण्यात आले. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करुन अज्ञात चोरटय़ाविरुध्द गुन्हा दाखल केला.
शाहूनगरमधील बंद फ्लॅट फोडून दीड लाखांचा ऐवज चोरीस
शहरातील शाहूनगर येथील सदगुरू रेसिडेन्सी येथील बंद फ्लॅटचा कडीकोयंडा उचकटून चोरटय़ांनी 20 हजार रुपयांच्या रोख रकमेसह सोन्या-चांदीचे दागिने असा एक लाख 53 हजार 300 रुपयांचा ऐवज चोरुन नेला. हा प्रकार देखील 7 मार्च रोजी उघडकीस आला. याबाबत श्रीनिवास रावसाहेब संकपाळ (45) यांनी संजयनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी अज्ञातावर गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी सांगितले, की फिर्यादी संकपाळ हे शाहूनगर येथील सदगुरू रेसिडेन्सी येथे फ्लॅट क्रमांक 302 मध्ये राहतात. 5 ते 7 मार्च दरम्यान त्यांचा फ्लॅट बंद होता. यावेळी चोरटय़ाने फ्लॅटच्या दरवाजाचे कुलूप व कोयंडा तोडून आतमध्ये प्रवेश केला. आतील साहित्य अस्ताव्यस्त करुन बेडरुममध्ये असलेले कपाट उचकटून त्यातून 20 हजार रुपयांची रोख रक्कम आणि सोन्याचांदीचे दागिने असा 1 लाख 53 हजार 300 रुपयांचा ऐवज चोरुन पोबारा केला. याबाबत संकपाळ यांनी संजयनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी घटनास्थळी भेट देवून पंचनामा केला. उपाधीक्षक अजित टिके यांनीही घटनास्थळी भेट देवून तपासाबाबत सूचना केल्या. पोलिसांनी तीन साक्षीदार तपासले असून चोरटय़ाचा शोध सुरु आहे.