प्रतिनिधी / शिराळा
फेरफार नोंदणीबाबत लोकांची गैरसोय व अडवणूक होऊ नये म्हणून तहसीलदार कार्यालयात एक महिन्यासाठी फेरफार नोंदणी कक्ष स्थापन केला आहे. जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांच्या आदेशानुसार हा उपक्रम १५ फेब्रुवारी ते १५ मार्च या कालावधीत राबविण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार गणेश शिंदे यांनी दिली.
लोकांना तलाठी स्थरावर फेरफार नोंदणी अर्जाबाबत काही अडचणी असतील अथवा अर्ज स्वीकारत नाहीत, अडवणूक होत असेल, तर अशा लोकांनी आपल्या नोंदीचे अर्ज या कक्षाकडे पाठवावेत. ते अर्ज संबंधित तलाठी यांच्याकडे पाठून अर्ज निर्गत केले जातील. तरी ज्या लोकांच्या नोंदी प्रलंबित आहेत त्या लोकांनी प्रथम तलाठी यांच्याकडे अर्ज द्यावा, त्या ठिकाणी काही अडचण असल्यास या कक्षाकडे अर्ज करावा. त्यासाठी स्वतंत्र माणसाची नेमणूक केली आहे. केलेल्या अर्जाची पोहच देऊन नोंदीची कार्यवाही पूर्ण केली जाईल.