खासगी सावकाराने 15 लाखांच्या बदल्यात 54 लाख उकळले, सावकारास अटक
प्रतिनिधी / मिरज
15 लाख रुपयांच्या कर्जापोटी 54 लाख रुपये वसूल करुन आणखी 80 लाखांची मागणी करत मालमत्ता नावावर करण्यासाठी धमकावल्याबद्दल राजू उर्फ रियाज गुलाब बागवान (वय 40 रा. आशीर्वाद कॉलनी, शंभर फूटी रोड मिरज) या खासगी सावकारास महात्मा गांधी चौकी पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी काँग्रेस अल्पसंख्यांक आघाडीचे उपाध्यक्ष अकबर बख्तावर मोमीन यांनी गांधी चौक पोलिसांत फिर्याद दिली आहे.
माजी आमदार हाफिज धत्तुरे यांचे जावई अकबर मोमीन यांनी जमीन खरेदी विक्री व्यवसायासाठी पाच वर्षापूर्वी राजू बागवान याच्याकडून १५ लाख रुपये दरमहा पाच टक्के व्याजाने घेतले होते. मोमीन यांनी पाच वर्षात बागवान यास वेळोवेळी ५४ लाख रुपये परत दिले. मात्र त्यानंतरही राजू बागवान याने निपाणी येथील आण्णा नामक सावकाराची ही रक्कम असून तुम्ही वेळेवर पैसे दिले नसल्याने ३० टक्के दंडासह आणखी ६५ लाख रुपये व १५ लाख रुपये मुद्दल द्यावे लागणार असल्याचे सांगितले. पैशाच्या वसुलीसाठी बागवान याने वारंवार मोमीन यांच्या घरात येऊन घरातील महिलांसमोर शिवीगाळ केली. रात्री अपरात्री मोमीन यांच्या घरासमोर मोटार थांबवून शिवीगाळ मालमत्ता नावावर करुन देण्यासाठी धमकावल्याचेही मोमीन यांनी तक्रारीत म्हंटले आहे.