वार्ताहर /सांबरा
सांबरा येथील सिद्धकला क्रिकेट क्लबतर्फे आयोजित आणि आमदार लक्ष्मी हेब्बाळकर पुरस्कृत आमदार चषक 2022 या मर्यादित षटकांच्या ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात सलमान स्पोर्ट्स पंतबाळेकुंद्री संघाने चांगळेश्वरी स्पोर्ट्स येळ्ळूर संघाचा 52 धावांनी पराभव करून 51 हजार व आकर्षक चषक पटकाविला.
अंतिम सामना दोन डावात खेळविण्यात आला. पंतबाळेकुंद्री संघाने प्रथम फलंदाजी करताना 8 षटकात 88 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल येळ्ळूर संघाने 72 धावा केल्या. 16 धावांची आघाडी घेत दुसऱया डावात पंतबाळेकुंद्री संघाने 96 धावा केल्या. 113 धावांचे उद्दिष्ट घेवून मैदानात उतरलेला येळ्ळूर संघ दुसऱया डावात केवळ 60 धावा जमवू शकला.
आमदार चन्नराज हट्टीहोळी यांच्या हस्ते विजेत्या आणि उपविजेत्या संघाला रोख रक्कम आणि चषक देवून गौरविण्यात आले. अंतिम सामन्याची नाणेफेक शिवराज जाधव आणि अब्दुल बागवान यांच्या हस्ते तर उपांत्य सामन्याची नाणेफेक देवस्थान कमिटी अध्यक्ष राजू देसाई आणि माजी ग्रामपंचायत अध्यक्ष विलास खनगावकर यांच्या हस्ते करण्यात आले.
मालिकावीरासाठी प्रकाश पाटील (हुबळी) पुरस्कृत सायकल शकीब लंगोटी (पंतबाळेकुंद्री) याने पटकावली. ग्रामपंचायत सदस्य नितीन देसाई पुरस्कृत उत्कृष्ट संघ पुरस्कार मराठा स्पोर्ट्स बसरीकट्टी संघाने, विशाल नागन्नावर पुरस्कृत उत्कृष्ट झेल पुरस्कार परशुराम कांबळे (सांबरा), ता.पं. सदस्य काशीनाथ धर्मोजी पुरस्कृत उत्कृष्ट फलंदाज अभिजित (येळ्ळूर) याने तर लक्ष्मण तिप्पनाचे पुरस्कृत उत्कृष्ट गोलंदाज पुरस्कार अझहर (पंतबाळेकुंद्री) याने तसेच उत्कृष्ट यष्टीरक्षक म्हणून सुशांत कडोलकर (हिंडलगा) यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देऊन गौरविण्यात आले. क्वॉलिटी डेव्हलपर्सच्या वतीने प्रत्येक सामन्यातील सामनावीर पुरस्कारासाठी टी-शर्ट पुरस्कृत करण्यात आले.
माजी जिल्हा पंचायत सदस्य नागेश देसाई यांनी स्वागत करून आभार मानले. प्रकाश पाटील, यल्लाप्पा हरजी आणि प्रकाश करेलकर यांनी समालोचन केले. मल्लाप्पा कांबळे आणि मारूती पाटील यांनी पंच म्हणून काम पाहिले. स्पर्धा यशस्वी पार पाडण्यासाठी प्रकाश चौगले, तरूण जत्राटी, विशाल नाईक, विजय नायर, ईश्वर कांबळे, यल्लाप्पा कांबळे, नितीन देसाई, मोहन हरज, सलीम काजी, सुनील नायर, श्रीकांत सनदी, संतोष पगडी, सुमीत नागन्नावर, महेश गिरमल आदींनी परिश्रम घेतले.