मेन रोडवर तसेच अन्य काही ठिकाणी रस्त्यावर अतिक्रमण
वार्ताहर /सांबरा
सांबरा ग्रामपंचायतीने अतिक्रमण हटाव मोहीम हाती घेतल्याने रस्त्याने मोकळा श्वास घेतला आहे. येथील मेन रोडवर तसेच अन्य काही ठिकाणी रस्त्यावर अतिक्रमण करण्यात आले आहे. काही व्यापाऱयांनी तर चक्क फुटपाथवरच दुकाने थाटली आहेत.
त्यामुळे नागरिकांना ये-जा करताना गैरसोयीचे होत आहे. याबाबत ग्रामपंचायतीने संबंधितांना वारंवार नोटीस बजावून देखील अतिक्रमण हटविण्यात आले नाही. शेवटी सांबरा ग्रामपंचायतीने अतिक्रमण हटविण्याचा निर्णय घेतला व रविवारी जेसीबीच्या साहाय्याने अतिक्रमण हटविण्यात आले.
रविवारी मेन रोडवरील काही ठिकाणचे अतिक्रमण हटविण्यात आले आहे. उर्वरित ठिकाणावरील अतिक्रमण लवकरच हटविण्यात येणार असल्याचे ग्रा. पं. अध्यक्षा रंजना अप्पयाचे यांनी ‘तरुण भारत’शी बोलताना सांगितले.