वार्ताहर / सांबरा
सांबरा येथील युवकांनी स्मशानभूमीसह गावातील मुख्य ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवून त्यानंतर औषध फवारणी केली आहे. गावातील सर्व युवकांनी एकत्र येऊन राबविलेल्या या उपक्रमाबद्दल ग्रामस्थांतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
गावातील युवकांकडून स्मशानभूमीसह गावचे मुख्य प्रवेशद्वार, छत्रपती शिवाजी चौक, बाजारपेठ, मेन रोडसह गावातील मुख्य ठिकाणी स्वच्छता मोहीम राबविली. त्यानंतर औषध फवारणी करून परिसर सॅनिटाईज करण्यात आला. तसेच गावातील एखाद्या व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाल्यास त्याच्यावर अंत्यसंस्कार करताना काही अडचणी आल्यास युवकांनी पुढाकार घेऊन अंत्यसंस्कार करण्याचे ठरविले आहे. त्यासाठी सपंर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
तसेच गावातील नागरिकांसाठी ऍम्ब्युलन्ससह तूर्तसेवा हवी असल्यास ग्रामस्थांना सर्वतोपरी मदत करण्याचे ठरविले असून त्यानुसार युवक रात्रंदिवस काम करत आहेत. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे. मोहिमेत विक्रम सोनजी, जीवन जयस्वार, संदीप अप्पायाचे, मल्लप्पा कांबळे, विनायक परीट, उमेश मास्तमर्डी, प्रसाद सोनजी, प्रशांत गिरमल, पुंडलिक जत्राटी, सूरज जोई, आदर्श बुचडी, संतोष देसाई, करण बर्डेसह युवक मोठय़ा संख्येने सहभागी होते.