वैभव कुरीबागी मालिकावीर, सामनावीराचा मानकरी
प्रतिनिधी/ बेळगाव
मुदस्सर नाजीरची भेदक गोलंदाजी, कर्णधार वैभव कुरीबारी व रोहित पाटील यांच्या आक्रमक शतकी भागीदारीच्या जोरावर साईराज वॉरियर्स संघाने विश्रृत स्ट्रायकर संघाचा 7 गडय़ांनी पराभव करून पहिला दीपक नार्वेकर 19 वर्षाखालील बीपीसी चॅम्पियन चषक पटकाविला. वैभव कुरीबागी याला मालिकावीर व सामनावीर असे दोन्ही पुरस्कार मिळाले. उत्कृष्ट फलंदाज जेनित मुडबागील, उत्कृष्ट गोलंदाज आकाश असलकर, स्पर्धेतील छाप सोडणारा खेळाडू अधोक्षज मानवी यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
युनियन जिमखाना मैदानावर रविवारी खेळविण्यात आलेल्या अंतिम सामन्यात विश्रृत स्ट्रायकर संघाने प्रथम फलंदाजी करताना 25 षटकात 9 गडी 142 धावा केल्या. सलामीवीर रविचंद्र उकळीने 2 षटकार, 8 चौकारासह 22 चेंडूत 49, कर्णधार दीपक राक्षेने 1 षटकार, 3 चौकारासह 33, दर्शन मयेकरने 18 तर किर्तन बेकवाडकरने 17 धावा केल्या. साईराजतर्फे मुदस्सर नाजीरने 21 धावांत 3 गडी बाद केले तर फिरकी गोलंदाज वैभव कुरीबागी व सुनील कुरी यांनी प्रत्येकी 27 धावात 2, समर्थ शेट्टीने 1 गडी बाद केला. 142 धावांचे आव्हान घेऊन उतरलेल्या साईराज वॉरियर्सच्या सलामीवीर कर्णधार वैभव कुरीबागी व रोहित पाटील यांनी पहिल्या षटकापासूनच आक्रमक खेळाचे प्रदर्शन घडविले. वैभव कुरीबागीने 3 षटकार व 8 चौकारासह केवळ 49 चेंडूत 73 धावा तर रोहित पाटीलने 8 षटकार व 4 चौकारासह 57 चेंडूत 57 धावा केल्या. वैभव व रोहित यांनी विश्रृत स्ट्रायकर्सच्या सर्व गोलंदाजांचा समाचार घेत 105 चेंडूत 138 धावांची पहिल्या गडय़ासाठी विक्रमी भागीदारी केली. केवळ 5 धावांची गरज असताना उत्तुंग फटके मारण्याच्या नादात वैभव, रोहित व नाजीर बाद झाले. साईराजने 18.3 षटकात 3 गाडी बाद 147 धावा करून एकतर्फी विजय मिळवित चषकावर आपले नाव कोरले. विश्रृततर्फे सिद्धार्थ गोदवानीने 34 धावात 2 गडी बाद केले.
सामन्यानंतर प्रमुख पाहुणे उत्तरचे आमदार अनिल बेनके, जगजंपी बजाजचे संचालक मल्लिकार्जुन जगजंपी, स्पर्धा पुरस्कर्ते दीपक नार्वेकर, ज्ये÷ क्रिकेटपटू प्रशांत निरंजन, जयदीप देशपांडे व विक्रम देसाई व्यासपिठावर उपस्थित होते. यावेळी गजानन फगरे, चंदर कुंदरनाड, शंतनु मानवी, जीवन वेर्णेकर, रवी काबाडी, महेश कोकीतकर व मनीष ठक्कर या संघ मालकांचा खास स्मृतीचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. या स्पर्धेतील विजेत्या साईराज वारियर्स व उपविजेत्या विश्रृत स्ट्रायकर्स संघाला आकर्षक चषक, प्रमाणपत्र, दोन्ही संघाच्या सर्व खेळाडुंना सुवर्ण व रौप्य पदके देऊन गौरविण्यात आले. वैयक्तिक बक्षिसे अंतिम सामन्यात (73 धावा व 2 बळी) अष्टपैलू कामगिरी करणाऱया वैभव कुरीबागी (साईराज), स्पर्धेत 211 धावा करणाऱया जेनित मुडबागील उत्कृष्ट फलंदाज, 15 गडी बाद करणाऱया साईराजचा आकाश असलकर उत्कृ÷ गोलंदाज, स्पर्धेत विशेष छाप सोडणाऱया अधोक्षज मानवी (आनंद चॅलेंजर), उत्कृष्ट यष्टीरक्षक रोहित पाटील (साईराज) व स्पर्धेत 211 धावा व 10 गडी बाद करणाऱया साईराजचा कर्णधार वैभव कुरीबागी याला मालिकावीर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. अंतिम सामन्यासाठी प्रमुख पंच म्हणुन चेतन बैलूर, मन्सुर बडेभाई तर स्कोअरर म्हणून रोहन वन्नूळी तर ऑनलाईन स्कोअरर शिवानंद पाटील यांनी काम पाहिले, क्रिकेटचे समालोचन प्रमोद जपे, आरिफ बाळेकुंद्री, अनिल कुडतुडकर यांनी केले.
ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी पॅरेन्ट्स बोर्ड संघटनेचे विक्रम देसाई, जयसिंह राजपूत, परशराम पाटील, नासिर सनदी व नागेश देसाई यांनी विशेष परिश्रम घेतले. स्पर्धेत अनिल गवी व ज्योती पाटील यांनी मैदान सुसज्ज बनविण्यासाठी परिश्रम घेतल्यामुळे त्यांचाही गौरव करण्यात आला.
संध्याराणी कांबळे
या स्पर्धेत 19 वर्षाखालील गटात एक महिला क्रिकेटपटू संध्याराणी कांबळे हिने ठसा उमटविला आहे. दैवज्ञ स्पोर्ट्स क्लबतर्फे फलंदाजी करताना ती 6 चेंडूना सामोरे गेली तर सीमारेषेलगत क्षेत्ररक्षण केले आणि झेल घेण्याचा प्रयत्न केला.
अधोक्षज मानवी
अधोक्षज मानवी या होतकरू व उदयोन्मुख क्रिकेटपटुने बीपीसी क्रिकेट स्पर्धेत उपांत्य फेरीत विश्रृत स्ट्रायकर संघाविरूद्ध खेळताना अचुक गोलंदाजीवर 26 धावात 7 गडी बाद करून या मैदानावरील नवीन विक्रम नोंदविला. संपूर्ण स्पर्धेत फलंदाजी व गोलंदाजीत चमक दाखवित त्याने संघाला विजय मिळवून देण्यासाठी सिंहाचा वाटा उचलला. भविष्यातही त्याच्याकडून उत्तम कामगिरी होण्याची अपेक्षा असून त्याला स्पर्धेतील सर्वोत्तम इम्पॅक्ट खेळाडू म्हणून निवडण्यात आले.