वृत्तसंस्था / नवी दिल्ली
देशातील विविध शहरामध्ये असलेल्या भारतीय क्रीडा प्राधिकरण (साई) केंद्रामध्ये उपलब्ध करून देण्यात आलेल्या नव्या सुविधांना सुप्रसिद्ध खेळाडूंची नावे देऊन त्यांच्या आठवणी जतन करण्याचा निर्णय केंदीय क्रीडा मंत्रालयाने घेतला आहे.
देशातील विविध क्रीडा प्रकारामधील खेळाडूंना सरावावेळी आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. साईच्या उपलब्ध सुविधामध्ये नव्याने सुधारणा करण्याच्या पहिल्या टप्यात मल्लांसाठी नव्याने वातानुकुलीत प्रशस्त दालन बांधण्यात येणार आहे. तसेच लखनौच्या एनसीओईमध्ये जलतरणपटूकरिता आधुनिक सुसज्ज जलतरण तलाव बांधण्यात येणार आहे. भोपाळच्या एनसीओई केंद्रामध्ये खेळाडूंसाठी 100 खाटांचे वसतिगृह बांधण्यात येणार आहे. सोनेपतमध्ये मुलींसाठी वसतिगृह उपलब्ध करून दिले जाईल. गौहातीच्या साई प्रशिक्षण केंद्रामध्ये विविध सुविधासह हॉस्टेल आणि हॉल उपलब्ध करून दिला जाणार आहे, अशी माहिती केंद्रीय क्रीडामंत्री किरेन रिजिजु यांनी दिली. भारतीय क्रीडाक्षेत्रामध्ये भरीव योगदान देणाऱया विविध खेळाडूंची नावे या नव्या सुविधांना दिली जाणार आहेत.