दूषीत पाण्याचा परिणाम, ११ जण रूग्णालयात
वारणानगर / प्रतिनिधी
सातवे पैकी शिंदेवाडी ता. पन्हाळा येथील दूषीत पाणी प्यालामुळे गॅस्ट्रोच्या साथीने थैमान घातले असून यामध्ये ऊस तोडणीचे काम करण्यास आलेल्या कुटूंबातील रितू सुरेश पावरा क्य ४ रा.खांबाडी ता.शिरपूर जि.धुळे या लहाण मुलीसह राजश्री राजेश पवार वय ५० रा.चिपळून या महिलेचा अशा दोघींचा बळी या गॅस्ट्रोने घेतला. या घटनेने आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली असून वेगवेगळ्या रूग्णालयात ११ रूग्ण उपचार घेत आहेत.
सातवे पैकी शिंदेवाडी येथे गेली चार दिवसापासून नागरिकांना पाण्यामुळे त्रास जाणवत होता तरी देखील पिणारे पाणी दूषीत झाले आहे. याची शंका देखील कोणाला आली नसल्यामुळे अतिसाराने नागरिक हैराण झाले होते. त्यामुळे मिळेल त्या रुग्णालयात सोयीप्रमाणे उपचार घेत आहेत असे समजते. सोमवार दि. २७ रोजी रात्री रितु पावरा या चार वर्षाच्या मुलीचा पहिला बळी गेल्यावर आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. तर आज मंगळवार दि. २८ रोजी राजश्री पवार वय ५० या महिलेचा उपचार सुरू असताना गॅस्ट्रोच्या त्रासाने ह्रदयविकाराचा झटक्याने मृत्यू झाला. गॅस्ट्रोने बळी गेलेली मुलगी व महिला ऊस तोड मजूरांच्या कुटूंबातील असल्पाने या घटनेने हळहळ व्यक्त होत आहे.
बोरपाडळे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय आधिकारी डॉ. सोनिया कदम यानी आरोग्य पथकासह सोमवार रात्री पासून शिंदेवाडीत तळठोकून उपचार प्रक्रिया गतिमान केली आहे.
दरम्यान तालुका आरोग्य अधिकारी विनोद मोरे हे देखील घटनास्थळावर दाखल झाले. पाणी पुरवठा करण्यास वापरात असलेल्या टाकीतील किंवा टाकीत विहरीतील येणारे पाणी दूषीत झाले आहे तेच पाणी शिंदेवाडी ग्रामस्थ तसेच ऊसतोडीसाठी असलेले मजूर पाणी पित असल्याने या दूषित पाण्यामुळे ही गॅस्ट्रोची साथ पसरली असून यामध्ये गंभीर अत्यवस्थ असलेले सातवे येथे पाच तर सीपीआर हॉस्पीटल येथील अतिदक्षता विभागात दोघावर उपचार सुरू असून प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नोंदणीनुसार गॅस्ट्रोचे ११ रूग्ण असून त्यामधील २ मयत झाले आहेत असे पन्हाळा तालुका आरोग्य अधिकारी विनोद मोरे यानी सांगीतले.
आज मंगळवारी घटनास्थळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.योगेश साळे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.उषा कुंभार यासह पंचायत समितीसह संबधीत अधिकारी वर्गाने भेटी देवून सर्वापर्यन्त उपचार पोहचतील अशी व्यवस्था करण्याचे आदेश बोरपाडळे प्राथमिक आरोग्य केंद्र, व सातवे आरोग्य उपकेद्रांतील अधिकारी संदीप जाधव व कर्मचारी यांना दिले.आरोग्य पर्यवेक्षक संपत पाटील, रूग्णवाहिका चालक श्रीकांत कुंभार यांच्यासह सर्वच आरोग्य यंत्रणा सतर्कपणे काम करू लागली आहे. दरम्यान सातवे मतदार संघाचे जिल्हा परिषद सदस्य शिवाजी मोरे, पंचायत समिती सदस्या उज्वला पाटील यानी घटनास्थळी भेट देवून आरोग्य उपचाराचा तसेच दाखल रूग्णांचा आढावा घेतला.
बोरपाडळे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या प्राथमिक आहवाला नुसार दूषित पाण्याने ही साथ पसरली आहे सातवे ग्रामपंचायतीने पाण्याची टाकी कधी साफ केली होती. दैनदिन पाण्याची टाकी वापरात होती का ? तसेच ग्रामस्थांना देण्यात येणारे पिण्याचे पाणी कोणत्या ठिकाणाहूण टाकीत सोडले जाते. या पाण्याची प्रयोग शाळेत तपासणी केली जात होती का ? या घटनेला जबाबदार कोण ? दोषीवर कारवाई होण्यासाठी आरोग्य विभाग पुढाकार घेणार काय अशा अनेक चर्चा ग्रामस्थात सुरू झाल्या असून आरोग्य यंत्रणेकडून ११ रूग्ण असल्याचे सांगीतले जात असलेतरी अनेक रूग्ण कोडोली, कोल्हापूर व सोयीच्या ठिकाणी उपचार घेत असल्याने या साथीच्या आजारात नक्की रूग्ण संख्या किती आहे हे सांगणे कठीण झाले आहे.
शिंदेवाडीतील ग्रामस्थांची योग्य दक्षता, टाकीतील पाणी दूषीत नाही : सरपंच अमर दाभाडे
ऊस तोड मजूरांना सातत्याने स्थलांतर होऊन काम करावे लागते त्यामुळे अनेक ठिकाणी मिळेल तसे पाणी प्यावे लागते शिंदेवाडी येथे ऊसतोड चालू होती याठिकाणी पाणी पुरवठा करणारी विहीर व तेथेच ओढ्याची ओघळ आहे त्यामुळे तोडणी मजूर कोणत्या ठिकाणचे पाणी प्याले हे सांगणे कठीण आहे तथापी लहाण बाळासह यांमध्ये महिलेचा अतिसाराने बाळी गेला असून गावाच्या दृष्टीने ती दुर्देवी व दुःखदायक घटना आहे. बोरपाडळे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या मार्गदर्शनाने पाणी पुरवठा करणाऱ्या टाकीची स्वच्छता, वेळोवेळी पाण्याची तपासणी, निर्जंतूकीकरण केले जाते तसेच गॅस्ट्रोची साथ पसरल्या पासून सातवे ग्रामपंचायत आरोग्य यंत्रजेच्या सोबत काम करून ग्रामस्थांची दक्षता घेतली असल्याचे सरपंच अमर दाभाडे यांनी सांगितले.