चारचाकीसह १.२६ लाखांचा मुद्देमाल जप्त
प्रतिनिधी / नागठाणे
अवैध दारू वहातुक करताना बोरगाव पोलिसांनी सापळा रचून दोन युवकांना ताब्यात घेतले.अंगापूर ते वर्णे जाणाऱ्या रस्त्यावर गुरुवारी सकाळी ही कारवाई करण्यात आली.पोलिसांनी यावेळी देशी दारूच्या बाटल्यांसह मारुती ओम्नी कार असा १.२६ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.या प्रकरणी ओमप्रकाश हरिदास राठोड ( वय.२२) व सागर विजय राठोड (वय.२१,दोघे रा.अपशिंगे(मि.),ता.सातारा) या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत बोरगाव पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार ओमप्रकाश हरिदास राठोड हा मारुती ओम्नी गाडीतून अवैध दारू घेऊन येणार असल्याची माहिती गुरुवारी सकाळी सपोनि डॉ.सागर वाघ यांना मिळाली.यावेळी सकाळी ९.३० च्या सुमारास पोलीस उपनिरीक्षक वर्षा डाळींबकर,हवालदार विशाल जाधव,प्रशांत मोरे,उत्तम गायकवाड, राहुल भोये यांनी अंगापूर- वर्णे जाणाऱ्या रस्त्यावर वर्णे(ता.सातारा) गावच्या हद्दीत कमानीजवळ सापळा रचला.
सकाळी १०.३० च्या सुमार संशयित मारुती ओम्नी गाडी वर्णे गावच्या दिशेने येताना दिसल्यावर पोलिसांनी ती गाडी अडवली.गाडीची तपासणी केली असता आतमध्ये देशी दारूचे १० बॉक्स आढळले.या बॉक्समध्ये ९० मिलीच्या १००० बाटल्या आढळल्या.पोलिसांनी या १० बॉक्ससह मारुती ओम्नी कार असा १,२६,४०० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करून कारमधील ओमप्रकाश हरिदास राठोड व सागर विजय राठोड या दोन युवकांविरुद्ध गुन्हा दाखल केला.पुढील तपास हवालदार विजय देसाई करत आहेत.