सकाळपासून महिलांच्यात उत्साहाचे वातावरण
आज भाजी भाकरीचा नैवेद्य
साध्या पद्धतीने सजावट
प्रतिनिधी / सातारा
गणराया पाठोपाठ सोनपावलांनी आज मंगळवार दि. 25 रोजी दुपारी 1 वाजून 58 मिनिटानंतर गौरीचे आगमन होत आहे. यंदा कोरोनामुळे साध्या पद्धतीने उत्सव साजरा होत असला तरी महिलांचा उत्साह वाढलेला आहे. सकाळपासून पुजेची तयार सूरू असून पहिल्या दिवशी भाजी-भाकरीचा नैवेद्य दाखवण्यात येत आहे.
गौरी कशाच्या पाऊली आली… सोन्या-मोत्याच्या पाऊली आली असे म्हणत आज घरा-घरात गौरीचे आगमन होत आहे. गेल्या काही दिवसापासून महिलांच्यात गौरी आगमनाची लगबग दिसत होती. बाजारपेठा सजावट, पुजेच्या साहित्यांनी सजल्या होत्या. सोमवारी रात्री उशीरापर्यंत खरेदी सूरू होती. आज मंगळवार दि. 25 रोजी सकाळपासून गौरीच्या स्वागतासाठी महिला आतूर झाल्या आहेत. गौरीला सजविण्यासाठी, तिला साजशृंगार करण्यासाठी महिलांनी विशेष परिश्रम घेत आहेत. साडय़ा नेसवून, बाजूबंद, लक्ष्मीहार, सवर्णजडीत कंबरपट्टे, बोरमाळ, हार तसेच सोन्याचे विविध दागिने घालणार आहेत.
दरवर्षी महिला मोठया संख्येने एकत्र येवून गौरी आगमनाची तयारी करतात. यंदा कोरोनामुळे सोशल डिस्टन्स पाळून दोन-तीन महिला एकत्र येवून पुजा करताना दिसत आहेत. चार-पाच दिवसामध्ये घरात मिष्टान्न तयार करण्यात आले आहे. ते पदार्थ गौरी पुढे मांडण्यात येणार आहे. पहिल्या दिवशी शापूच्या भाजी आणि भाकरीचा नैवेद्य दाखविण्यात येणार आहे.