प्रतिनिधी / सातारा
वाढीव निधी मिळत नसल्याने सातारकरांचा जीवनदाता असलेल्या कास धरणाच्या उंची वाढवण्याच्या कामाला ब्रेक लागला होता.ना.अजित पवारांनी आ.शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या मागणीवरुन या प्रकल्पाला मंजूरी दिली होती त्याच ना. पवारांनी काही दिवसांपुर्वी आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्याच मागणीवरुन कास धरण प्रकल्पासाठी वाढीव ५८ कोटी निधीला प्रशासकीय मान्यता देवून निधी मंजूर केला होता. मंजूर ५८ कोटी पैकी २५ कोटी रुपयांचा पहिला हप्ता नुकताच सातारा पालिकेकडे वर्ग झाला आहे. त्यामुळे कास धरणाचे रखडलेले काम पुन्हा सुरु होणार असून हा प्रकल्प लवकरच पूर्णत्वास नेऊ, असे आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी म्हटले आहे.
सद्य परिस्थितीत कास धरण प्रकल्पाचे काम ७५ ते ८० टक्के पुर्ण झाले आहे. मात्र वाढीव निधीची तरतूद न झाल्याने गेल्या अनेक महिन्यांपासून पुढील काम रखडले आणि कास धरण प्रकल्प पुर्णत्वास जाणार का ? सातारकरांचा पाणीप्रश्न सुटणार का ? असे प्रश्न निर्माण झाले होते. मात्र पुन्हा एकदा आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या मागणीनुसार ना. अजित पवार यांनी या प्रकल्पासाठी वाढीव ५८ कोटी निधी मानूर करून दिला.
सद्या मेडिकल कॉलेजचा प्रश्न सुटला तसेच सातारकरांच्या जिव्हाळ्याच्या कास धरण प्रकल्पाला मंजुरी मिळाली आणि वाढीव निधीही उपलब्ध झाला. आता ५८ पैकी २५ कोटींचा पहिला हप्ता नुकताच सातारा पालिकेकडे वर्ग करण्यात आला असून कास धरणाचे बंद पडलेले काम आता पुन्हा सुरु होणार आहे. जसजसे काम पुढे जाईल तशी उर्वरित रक्कमही पालिकेला मिळेल आणि हा प्रकल्प येत्या काही दिवसात पूर्णत्वास जाणार आहे.
हद्दवाढीत समाविष्ट रस्त्यांची कामे मार्गी लागणार
पालिका हद्दवाढीत समाविष्ट झालेल्या भागातील रस्त्यांची कामे मार्गी लावण्यासाठी आ. शिवेंद्रसिंहराजे यांचा पाठपुरावा सुरु आहे. यासंदर्भात आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन हद्दवाढीत समाविष्ट झालेल्या भागातील रस्त्यांसाठी निधीची मागणी केली होती. ना. शिंदे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून लवकरच या रस्त्यांसाठी भरीव निधी उपलब्ध होणार आहे. सर्व रस्त्यांची कामेही लवकरच मार्गी लागतील, असे आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी म्हटले आहे.