दोन ठिकाणचे वेगवेगळे अहवाल आल्याने घारेवाडीसह तालुक्यात संभ्रम
वार्ताहर / कोयना वसाहत
घारेवाडी (ता.कराड) येथील तालुका आरोग्य विभागाने स्वॅब घेतलेल्या 11 नागरिकांचे अहवाल रविवारी रात्री कोराना बाधित आल्याने तालुक्यात खळबळ उडाली होती. मात्र यातील आठ नागरिकांनी सोमवारी सकाळी कृष्णा रूग्णालयात जाऊन पुन्हा स्वॅब तपासणीसाठी दिला असता संध्याकाळी त्या आठही जणांचा अहवाल निगेटीव्ह आला. या सर्वांची एचआरसीटी टेस्ट केली असता तीही निगेटीव्ह आली आहे. 24 तासात दोन वेगवेगळया ठिकाणचे अहवाल वेगळे आल्याने घारेवाडीसह तालुक्यात संभ्रमाचे वातावरण पसरले आहे.
23 फेब्रुवारी रोजी घारेवाडी येथील दुध डेअरी चालकाचा अहवाल कोरोना बाधित आल्याने ग्रामपंचायतीसह, आरोग्य व महसूल विभाग सतर्क झाला होता. संबंधित दूध डेअरी चालकाच्या सानिध्यात आलेल्या एकुण 30 लाकांचे स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्यातील 3 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आल्याने प्रशासन अधिकच सतर्क झाले. अधिक खबरदारीचा उपाय म्हणून कोळे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून शनिवारी घारेवाडी यथे स्वॅब तपासणीचे शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात गावातील विविध प्रकारच्या 62 व्यावसाईक व ग्रामस्थांचे स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. रविवारी रात्री यातील 11 जणांचे अहवाल कोरोना बाधित आल्याने घारेवाडीसह कराड तालुक्यात खळबळ उडाली होती.
जेमतेम तीन ते चार हजार लोकसंख्या असलेल्या घारेवाडीसारख्या छोटयाशा गावात 11 व्यवसायिकांचे अहवाल बाधित आल्याने सोमवारी सकाळी तालुक्याचे प्रशासन घारेवाडी येथे पोहोचले होते. बाधित आलेले 11 जण व्यावसाईक असल्याने त्यांचा संपर्क गावाशी येण्याची शक्यता गृहीत धरून तालुका प्रशासनाने घारेवाडीत उपाययोजना राबवण्यास सुरवात केली आहे. प्रांत उत्तम दिघे यांनी घारेवाडी गावच्या सीमा सील करण्याचे आदेश दिले आहेत. तर गटविकास अधिकारी डॉ. आबासाहेब पवार व तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संगीता देशमुख यांनी घारेवाडी येथे भेट देऊन उपाययोजनांबाबत सूचना केल्या. यावेळी सरपंच सुवर्णा घारे, उपसरपंच रंजना घारे, कोळे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनीता थोरात, ग्रामसेविका गीता कोळी, तलाठी ए. के. सुतार, सदस्य तानाजी घारे, सूर्यकांत कोठावळे, अरुणा घारे, पोलीस पाटील संदीप वगरे, सर्जेराव घारे आदी उपस्थित होते.
दरम्यान ज्या 11 जणांचे अहवाल बाधित आले, त्यांना कुठल्याही प्रकारची लक्षणे दिसत नसल्याने ग्रामस्थांतून शंका उपस्थित होत होती. त्यामुळे अकरापैकी 8 जणांनी सोमवारी सकाळी कृष्णा रूग्णालयात जाऊन पुन्हा स्वॅब तपासणीसाठी दिले. संध्याकाळी त्या आठही जणांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने अधिकच गोंधळाचे वातावरण पसरले आहे. 24 तासाच्या अंतरात दोन्ही ठिकाणी केलेल्या आरटीपीसीआर टेस्टचे अहवाल वेगवेगळे आल्याने संभ्रमाचे वातावरण पसरले आहे.
तरीही होम आयसोलेट व्हायचे…
घारेवाडीतील आठ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले असले तरीही त्या लोकांना 14 दिवस होम कॉरंनटाईन रहाण्याच्या सुचना प्रशासनाने केल्या आहेत. तसेच बाधितांच्या संपर्कात आलेल्या लोकांनीही विषेश काळजे घेण्याच्या सुचना देण्यात आल्या आहे. तसेच बाधितांच्या निकट सहवासीतांचेही स्वॅप तपासणीसाठी घेण्यात येणार आहेत. आरोग्य विभागाच्या माध्यमातुन संपूर्ण गावात सर्व्हेचे काम सुरू करण्यात आले आहे. ग्रामस्थांनी आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.