प्रतिनिधी / सातारा
सातारा जिल्हा रुग्णालयात उपचार घेण्यासाठी दाखल असलेल्या रुग्णांच्या गळयात सोन्याचांदीचे दागिने असल्यास व खिशात पैसे आणि मोबाईल असल्यास तो उपचारादरम्यान चोरीला गेल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. हा प्रकार गेल्या कित्येक वर्षापासून सुर आहे. त्याचाच आज प्रत्यय आला तो म्हणजे जावली तालुक्यातील रायगाव येथील अरुणा गोपीनाथ काळे (वय 62) या वृद्धेच्या गळय़ातील दागिनेच चोरटय़ांनी गायब केल्याची घटना घडली. मृताच्या गळय़ातील दागिने गायब असल्याची बाब समोर येताच नातेवाईकांनी रुग्णालयावर आरोप करताच जिल्हा शल्यचिकित्सक खडबडून जागे झाले.
जिल्हा रुग्णालयात रुग्णांच्याकडील मौल्यवान वस्तू गायब होण्याच्या अनेकदा चर्चा रंगायच्या. परंतु आज प्रत्यक्ष मृत महिलेच्या अंगावरील दागिने गायब झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. रायगाव येथील अरुणा गोपीनाथ काळे यांना त्रास होऊ लागल्याने आज सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास तिच्या नातेवाईकांनी तिला उपचारासाठी येथील जिल्हा रुग्णालयात दाखल केले. तिला दाखल करून घेतल्यानंतर ईसीजी काढण्यासाठी तिला अन्य वॉर्डमध्ये हलविण्यात आले.
त्यावेळी तिच्या गळ्यात सोन्याची माळ होती. दरम्यान ईसीजी काढल्यानंतर तिची प्रकृती खालावली त्यामुळे तिला अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले मात्र उपचार सुरु असताना तिचा मृत्यू झाला. दरम्यान, तिचा मृतदेह ताब्यात घेत असताना तिच्या नातेवाईकांना गळ्यात सोन्याची माळ नसल्याचे निदर्शनास आले. अतिदक्षता विभागात त्या सोन्याच्या माळेमधील काळे मणी तुटून पडल्याचे दिसून येत होते. त्यावरून अज्ञात चोरटय़ाने त्या मृत महिलेच्या गळ्यातून हिसका मारून सोन्याची माळ तोडल्याचे स्पष्ट होत आहे. दरम्यान नातेवाईकांनी याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. दरम्यान, याबाबत चौकशी समिती स्थापन करणार असल्याने जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी सांगितले.
इंजेक्शनही चोरीला गेले होते
कोरोना काळात यास रुग्णालयातून रेमडीसिवर 17 इंजेक्शनची चोरी झाली होती. त्या घटनेनंतर आज दागिन्यांची चोरी झाल्यामुळे रुग्णांचे नातेवाईकामध्ये एकच खळबळ उडाली आहे.