सातारा / प्रतिनिधी :
सातारा जिल्हा रुग्णालयात सुरु असलेल्या लसीकरण केंद्रावर लस देण्यासाठी देण्यात येणाऱ्या कुपनामध्ये मोठा घोटाळा केला जात असल्याचा आरोप बुधवारी पहाटे सातारकरांनी केला. केवळ पंधरा मिनिटात कुपन संपल्याचे सांगण्यात आल्यामुळे रांगेमध्ये उभा राहिलेल्या नागरिकांनी एकच गदारोळ केला. प्रकरण हातघाईवर गेल्यामुळे काही वेळ लसीकरण केंद्राबाहेर तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, लसीकरण केंद्रात काम करणारे कर्मचारी तोंडे पाहून कुपन देत असल्याचा आरोप होत असून, लसीकरण केंद्राचे प्रमुख डॉ. कारंजकर यांच्यासह कर्मचाऱ्यांची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन लस देण्यासाठी दोन स्वतंत्र केंद्रे जिल्हा रुग्णालयात गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहेत. लस घेण्यासाठी रोजच मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे. विशेषता कोव्हिशिल्ड या लसीला मोठय़ा प्रमाणावर मागणी होत आहे. मंगळवारी सायंकाळी कोव्हिशिल्डच्या एकूण 700 लसी जिल्हा रुग्णालयाला प्राप्त झाल्या. त्यापैकी एका लसीकरण केंद्रावर 450 तर दुसऱ्या लसीकरण केंद्रावर 250 लसीकरण करण्याचे प्रयोजन करण्यात आले होते.
लसीकरणासाठी बुधवारी पहाटे पासून, लसीकरण केंद्रावर फार मोठय़ा प्रमाणावर नागरिकांनी गर्दी केली. सकाळी 7.30 वाजण्याच्या सुमारास लसीकरण केंद्रातील कर्मचारी टोकन घेऊन आले. मात्र त्यानंतर 15 मिनिटात टोकन संपल्याचे सांगण्यात आल्यामुळे एकच गदारोळ उडाला. यावेळी एकाच नागरिकाला दोन टोकन देण्याचा प्रकार घडल्याने याबाबत जाब विचारत अनेकांनी गोंधळ घातल्यामुळे काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. सुरक्षा रक्षकांनी मध्यस्थी केल्यामुळे काही वेळाने वातावरण शांत झाले असले तरी अनेक नागरिकांनी लसींच्या टोकनमध्ये घोटाळा होत असल्याचा आरोप केला.