प्रतिनिधी / सातारा
सातारा तालुक्याचा आरोग्य विभाग पूर्णपणे ढेपाळला आहे. प्रत्यक्ष कार्यालयातच सोशल डिस्टनन्स फज्जा उडत आहे. सातारा पंचायत समितीच्या आरोग्य विभागाचे आधीच केबिन अरुंद त्यातच कसेबसे कामकाज चालते आहे. गडबडीत चुकीच्या नोंदीमुळे ग्राऊंड लेव्हलला सर्व्हे करणाऱ्या कर्मचाऱ्यांची त्रेधा उडत आहे. सातारा तालुक्यातील 12 जण बाधित आढळून आले असून दररोजचा वाढता आकडा पाहून पंचायत समितीच्या आरोग्य विभागाची तंतरली आहे.दरम्यान, तालुका वैधकीय अधिकारी यांच्यावर सातारा शहरातल्या काही मंडळींनी दबाव टाकल्यामुळे त्यांनी जिल्हाधिकारी यांच्या नावाने माहिती देणे टाळले आहे. दस्तुरखुद्द गटविकास अधिकारी हे ही ज्या भागात राहतात तो भाग मायक्रो कंटेंटमेंट झोन असून ही मासिक सभेला आले होते. सातारा पालिकेच्या कोरोना कक्षात काय सुरू आहे ? जे कर्मचारी नेमलेत त्यांची मती गुंग झाल्याची चर्चा आहे.
सातारा तालुक्यात 194 गावे आहेत.त्या गावांना आरोग्य सुविधा प्राथमिक आरोग्य केंद्राकडून दिली जाते. कोरोनाच्या काळात सातारा पंचायत समितीच्या आरोग्य विभागाकडून नियमांची पालमल्ली होताना दिसत आहे. पंचायत समितीच्या वरच्या मजल्यावर कोपऱ्यात छोट्या खोलीत आरोग्य विभाग कार्यरत आहे.त्या विभागाच्या खोली पेक्षा आरोग्य अधिकारी डॉ.पवार यांची केबिन मोठी आहे.याच विभागात कर्मचारी तसेच काम करतात.वास्तविक सोशल डिस्टनन्स पाळले गेले पाहिजेत. मास्क वापरला गेला पाहिजे, एकत्र जेवण केले नाही पाहिजे परंतु काही जण हे नियम मोडत असतात. तालुका वैधकीय अधिकारी हे सेवानिवृत्त होण्यासाठी थोडे दिवस राहिलेले असताना काम करत आहेत.त्यांचे कोणीही ऐकत नाही.मात्र, त्यांच्यावर दबाव आणण्याचे काम केले जात आहे.गटविकास अधिकारी हे ज्या परिसरात राहत आहेत त्या ठिकाणी मायक्रो कंटेंटमेंट झोन आहे. तरीही ते मासिक बैठकीला हजर होते असा आरोप काही सदस्यांनी केला होता. अधिकारीच नियम मोडत आहेत.
जिहेत साखळी आहेच
जिहे येथे पुन्हा रात्री एक 69 वर्षाचा वृद्ध आणि 50,51 वर्षाचे दोघे असे तीन पुरुष बाधिताच्या संपर्कात आल्याने तर एक 24 वर्षाची युवती,60 व 65 वर्षाच्या वृद्ध महिला, 52 व 42 वर्षाच्या दोन महिला बाधित झाल्या आहेत.गावात साखळी अजून सुरूच आहे.खावली येथील 60 वर्षीय महिला व 63 वर्षिय पुरुष, कण्हेर येथील 60 वर्षीय महिला, कोडोली येथील 40 वर्षीय महिला हे बाधित ही निकट सहवासात आलेले आहेत.
अधिकारी घेणार कधी काळजी
कोणा ऐऱ्यागैऱ्याचे ऐकून माहिती देण्यास प्रशासन टाळाटाळ करत आहे.वास्तविक जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल वा नगरपालिका असेल येथील काही अधिकारी हे ज्या परिसरात राहतात तेथे कंटेंटमेंट झोन आहे.तरी कामावर येतात.तसेच काही कर्मचारी हे बाहेरच्या जिल्ह्यातून येतात.काहींच्या हातावर कोरोन टाइन चे शिक्के आहेत तरीही ते कामावर आहेत.म्हणजे लोका सांगे ब्रह्मज्ञान आणि शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचं कोरडे पाषाण असा प्रकार सुरू आहे.तरुण भारतकडून योग्य तीच माहिती सातारकरांच्या हिताची प्रसिद्ध केली जाते.
पालिकेतल्या कोरोना कक्षाला वालीच नाही
पालिकेच्या कोरोना कक्षातल्या महिला अधिकारी यांना कोरोनाची बाधा झाल्याने सगळेच कामकाज ढेपाळले आहे.नव्याने जबाबदारी दिलेल्या कर्मचारी हा एवढा अनुभवी नाही तो फक्त कार्यलयात नवीन आलेल्या महिला कर्मचाऱ्यांशी गुलुगुल बोलण्यात माहिर आहे.त्यामुळे प्रत्यक्ष जे ग्रास रूट ला सर्व्हेला कर्मचारी आहेत त्यांची तारांबळ उडते आहे.सक्षमपणे कक्षतील कर्मचारी काम करत नाही असे दिसते.