प्रतिनिधी / नागठाणे
महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद नर्सेस संघटनेतर्फे प्रलंबित मागण्यांसाठी मंगळवार १ सप्टेंबर पासून आंदोलन छेडण्यात येणार आहे. याबाबचे निवेदन जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देण्यात आले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, राज्यात महिला आरोग्य सेवकांची पदे निम्म्याने रिक्त आहेत. ही पदे टेंडर पद्धतीने लवकर भरावीत. ही रिक्त पदे भरताना सध्या कंत्राटी पद्धतीने काम करत असलेल्या महिला आरोग्य सेवकांचा प्राधान्याने विचार करावा. बंधपत्रित महिला आरोग्य सेविकांची सेवा रुजू दिनांकपासून ग्राह्य धरून त्यांना कायम करावे या अशा विविध प्रलंबित मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येणार आहे.
१ सप्टेंबर ते ७ सप्टेंबर या काळात आंदोलनकर्ते रुग्णसेवा विस्कळीत न होऊ देता काळ्या फिती लावून आंदोलन करणार असून या काळात मागण्या मान्य न झाल्यास बेमुदत काम बंद आंदोलन केले जाईल असा इशारा शेवटी या निवेदनात देण्यात आला आहे.