प्रतिनिधी / नागठाणे :
सातारा जिल्ह्यात प्रसिद्ध असणारी नागठाणे (ता.सातारा) येथील ‘माळावरची यात्रा’ व श्रीराम रथोत्सव रद्द करण्यात आल्याची माहिती नागठाणे ग्रामपंचायतीच्या सरपंच डॉ.रुपाली बेंद्रे व उपसरपंच अनिल साळुंखे यांनी दिली आहे.कोरोना साथरोगाच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील यात्रा, जत्रांवर घातलेल्या निर्बंधामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.
नागठाणेची माळावरची यात्रा ही जिल्ह्यात प्रसिद्ध आहे. या यात्रेच्या निमित्ताने दहा दिवस येथे जनावरांचा मोठा बाजार भरतो. तसेच गावचे आराध्यदैवत प्रभू श्री रामचंद्रांची भव्य रथयात्रा येथे निघते. यावर्षी 12 फेब्रुवारीला हा रथोत्सव होणार होता. मात्र, जिल्ह्यात कोरोना साथरोगाच्या पार्श्वभूमीवर अद्यापही मोठ्या स्वरूपात भरणाऱ्या यात्रा, जत्रांवर निर्बंध घालण्यात आले आहेत.त्यामुळे यावर्षी येथील ही माळावरची यात्रा व त्या निमित्ताने निघणारी प्रभू श्री रामचंद्रांचा भव्य रथोत्सव रद्द करण्याचा निर्णय सर्व ग्रामस्थांच्या सहकार्याने घेण्यात आला आहे.
केवळ रथोत्सवादिवशी गावातील अजिंक्य चौकात पालकमंत्री बाळासाहेब पाटील, खा.श्रीनिवास पाटील, सातारा -जावली विधानसभा मतदारसंघाचे आ.शिवेंद्रसिंहराजे भोसले, कराड उत्तरचे युवा नेते सागर पाटील, ग्रामपंचायत सदस्य व मोजक्या ग्रामस्थांच्या उपस्थितीत रथ पूजन करण्यात येऊन जागेवरच रथ उभा करण्यात येणार आहे, असे यावेळी त्यांनी सांगितले.