जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे पाठवला प्रस्ताव
सातारा / प्रतिनिधी :
सातारा पंचायत समितीची सध्याची इमारत ही अतिशय जुनी आहे. अतिशय अरुंद अशी अडगळ बनलेली आहे. काही विभागाना जागा पुरत नाही. त्यामुळे अनेकवेळा इमारत नव्याने बांधण्याचा विषय ऐरणीवर येतो अन् पुन्हा तो थांबला जातो. परंतु याच मुद्यावरुन सातारा पंचायत समितीच्या सभापती सरिता इंदलकर या आक्रमक झाल्या आहेत. त्यांनी नुकतेच जिल्हा परिषदेत त्याबाबत आवाज उठवून तसा प्रस्ताव जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांच्याकडे पाठवला आहे.
सध्याची सातारा पंचायत समितीची इमारत ही जिल्हाधिकऱ्यांच्या मालकीच्या जागेत आहे. त्यामुळे नव्याने बांधकाम करता येत नाही. नुतनीकरण करायचे असले तरीही जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घ्यावी लागते. आजपर्यंत अनेक सभापतींनी इमारती नवीन बांधण्यासाठी खटपटी केल्या. परंतु आहे त्याच जागेवर सातारा पंचायत समितीची इमारत नव्याने बांधता येत नाही, असे शेवटास जाणवते. विद्यमान सभापती सरिता इंदलकर यांना ही बाब निदर्शनास आली.
त्यांनी पंचायत समितीत अनेक विभागाना स्वतंत्र केबीन नाही, एकाच केबीनमध्ये दोन ते तीन विभागाचे टेबल बसतात. किचकट अशी रचना असल्याने सातारा पंचायत समितीची नवीन इमारत ही जिल्हा परिषदेच्या मालकीची पोवई नाक्यावर जागा आहे. त्या जागेत प्रशस्त अशी इमारत बांधता येईल, अशा मागणीचा प्रस्ताव त्यांनी काल दिला आहे. तसा जिल्हा परिषदेच्या सभेत आवाजही उठवून जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले यांचे लक्ष वेधून घेतले आहे.