प्रतिनिधी / उंब्रज :
पेरले ता.कराड गावच्या हद्दीत सोन्याची डील करण्यासाठी आलेल्या चार परप्रांतीय संशयितांनी पोलीस कर्मचाऱ्यास गंभीर मारहाण केल्याची घटना शुक्रवारी रात्री ८.४५ वाजणेच्या सुमारास घडली. या घटनेची फिर्याद पो.काॅ. मुकेश संभाजी मोरे यांनी उंब्रज पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. दरम्यान, या प्रकरणातील संशयितांना अवघ्या काही तासात पकडण्यात पोलिसांच्या संयुक्तीक पथकाला यश आले असून, कटणी मध्यप्रदेश येथील आठ जणांची टोळी जेरबंद केल्याची माहिती जिल्हा पोलीस प्रमुख अजयकुमार बन्सल यांनी दिली.
याबाबत अधिक माहिती अशी की, मध्यप्रदेशातील कटणी येथील आठ जणांची टोळी बनावट सोने देत लोकांना फसवून मारहाण करुन पसार होत होती. कराड हद्दीत अशाप्रकारच्या घटना घडल्या आहेत. दरम्यान शुक्रवारी सायंकाळी उंब्रज पोलीस ठाणे हद्दीत पेरले ता. कराड गांवचे हद्दीत जानाई पेट्रोल पंपापासून काही अंतरावर शिरगांवकडे जाणाऱ्या रोडवर पाटण पोलीस स्टेशनचे पोलीस कॉन्सटेबल मुकेश संभाजी मोरे हे शासकीय कामानिमीत्त साताराकडे त्यांच्या खाजगी वाहनाने निघाले होते. त्यांना बातमी दारामार्फत माहिती मिळाली की, पेरले गावच्या हद्दीत सोन्याची डील होणार आहे. या माहितीची पडताळणी करीत असताना पो. कॉ. मोरे यांना चार संशयित व्यक्ती रस्त्याकडेला दिसल्याने त्यांनी विचारणा केली असता त्यांना चौघांनी शिवीगाळ करुन लाकडी दांडकी, गजाने मारहाण करुन जखमी केले. तर एकाने मोरे यांच्या उजव्या हाताच्या दंडास चावा घेतला.
याबाबत मुकेश संभाजी मोरे, पोलीस कॉन्स्टेबल पाटण पोलीस स्टेशन, यांनी उंब्रज पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीवरुन नमुद इसमांविरुध्द गुन्हा रजि. नं. ९३/२०२१ भादविसं. कलम ३५३, ३३२, ५०४, ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.
दरम्यान, संबंधित इसमांनीच त्यांच्या इतर साथीदारांसह दि. २६ रोजी रात्री ८.३०वा. च्या सुमारास कराड येथून लोकांना सोने कमी दरात देतो, असे फोनवर सांगून पेरले फाट्यावर बोलावून शेतात नेले. त्यांना कमी किमंतीत सोने म्हणुन गाठोडे दाखवुन त्यांनी त्यांचे जवळील 12 हजार हिसकावून त्यांना लाकडी दांडके, लोखंडी गजाने मारहाण करुन गंभीर जखमी केले. याबाबत इंद्रजीत सुनील कांबळे रा. ओगलेवाडी ता. कराड यांनी दिलेल्या फिर्यादी वरुन उंब्रज पो. स्टे. ला भादंविसं. कलम ३९५, ३९७ प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे.